राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं आहे. मात्र यावरुन आता वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी व्यक्त करताना रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मागील काही दिवसांपासून सावरकरांसंदर्भातील प्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही टोला लगावला आहे.कोश्यारी यांच्या या विधानानंतर रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन त्यांचा फोटो पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. तर भाजपा आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना, “विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते,” असंही रोहित पवार म्हणालेत.