लेखक-दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘विक्रम वेधा’चा ट्रेलर आज कलाकारांच्या हस्ते मुंबईतील विशेष कार्यक्रमात औपचारिकरीत्या लाँच करण्यात आला.
औपचारिक प्रक्षेपणाची तयारी करत ‘विक्रम वेधा’च्या निर्मात्यांनी काल कलाकारांच्या चाहत्यांसाठी दुबईसह देशभरातील १० शहरांमध्ये एका विशेष प्रिव्ह्यूचे आयोजन केले होते. अशा प्रकारे चित्रपट प्रमोट करण्यासाठी पुढाकार घेत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामुळे एक दिवस अगोदरच या चित्रपटाचा जोरदार प्रचार होण्यास मदत झाली असून, टीझरच्या प्रचंड यशानंतर अपेक्षाही वाढल्या आहेत.
‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत असून, शहरी भागांसोबतच सोशल मीडियावर अविश्वसनीय प्रेम आणि कौतुक होत आहे. ‘विक्रम वेधा’मध्ये अनुक्रमे सैफ अली खान आणि हृतिक रोशन विक्रम आणि वेधा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत एका सरळमार्गी शूटिंग पोलिसाच्या व्यक्तिरेखेत जीव ओतताना दिसणार आहे, तर वेधा नावाच्या गुंडाच्या भूमिकेत हृतिक रोशन आहे.
हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांना त्यांच्या ट्रेलरमधील परफॉर्मन्ससाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शरीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘विक्रम वेधा’ या अॅक्शन-थ्रीलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. ‘विक्रम वेधा’ची स्टोरी वेगवेगळ्या नाट्यमय वळणांनी भरलेली असून, एक कठोर पोलीस असलेला विक्रम (सैफ अली खान) खतरनाक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघाल्याचं पहायला मिळणार आहे. चोर-पोलिसांच्या या पाठशिवणीच्या खेळात वेधा प्रमुख कथाकाराच्या रूपात कथांच्या मालिकेद्वारे विक्रमला विचार प्रवृत्त करून नैतिक संदिग्धता सोडवण्यास मदत करतो.
‘विक्रम वेधा’ची प्रस्तुती गुलशन कुमार, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, भूषण कुमार, एस. शशिकांत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.