मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांचा गैर पद्धतीने हस्तक्षेप
कराड-वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प हुकूमशाही पध्दतीने गुजरातला हलविण्यात आला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये आज पत्रकार परिषदेत केला.मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्त्व वाढविण्यासाठी पंतप्रधानांनी गैर पद्धतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणत प्रकल्प गुजरातला नेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारची राज्याला जबर किंमत मोजावी लागणार असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, 1 लाख 54 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव परिसरात येणार होता. प्रकल्प येणार हे जवळजवळ निश्चित झाले होते. तळेगावमध्ये कमी किमतीत जागाही उपलब्ध करून दिली जाणार होती. केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला मोठ्या रकमेचे अनुदान मिळणार आहे. मात्र, अचानक चक्रे फिरली आणि गुजरात राज्यात प्रकल्प जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. पंतप्रधानांनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करत कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातला नेला.
हायजॅक करणे भाजपची नीती
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये मरीन अॅकॅडमीला जमीन दिली होती. दुर्देवाने त्यानंतर सत्तांतर झाले आणि सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वाने तो प्रकल्पही हायजॅक केला. त्यानंतर फणवणीस सरकारच्याच काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देखील महाराष्ट्रातून अहमदाबादला नेले. मोठे प्रकल्प गुजरातला नेऊन मुंबईचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढविण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय फ्लाईटची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत अहमदाबादमध्ये फ्लाईट येत नाहीत. तरीही मुंबईतील प्रकल्प अहमदाबादला का नेले जात आहेत, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ठाणे, पालघर भागातून जाणार्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला कसलाही फायदा होणार नसताना मोदींच्या हट्टापोटी हा प्रकल्प लादला गेला आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बीकेसीसारख्या बिझनेस सेंटरमधील हजारो कोटींची जागा बुलेट ट्रेन स्टेशनसाठी दिली आहे. यामध्ये सरकारमधील काही जणांचा फायदा आहे. काही जणांच्या फायद्यासाठी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची जी मालिका सुरू आहे. त्या मालिकेतील वेदांता-फॉक्सकॉन हा तिसरा प्रकल्प आहे. हुकूमशाही पध्दतीने प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारचा अशा पध्दतीने फटका महाराष्ट्राला बसतोय. मोदींचा आदेश आला की निमुटपणे तो पाळण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री करतात.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही बंद केलेले उद्योगातील लायसन्स राज मोदींनी पुन्हा आणले आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे ही महाराष्ट्रासाठी तोट्याची गोष्ट ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प अशा पध्दतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न यापुर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी याबद्दल राज्यातल्या डबल इंजिन सरकारला जाब विचारला पाहिजे.
मी काँग्रेस सोडणार, वेगळा निर्णय घेणार, अशा बातम्या कोण पेरतयं?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी काँग्रेस सोडणार, वेगळा निर्णय घेणार, अशा बातम्या कोण पेरतंय ते मला माहित नाही. मी काँग्रेसच्याच विचारांचा आहे, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली असून काँग्रेस पक्षच लोकशाही वाचवू शकतो. पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष असावा, अशी आम्ही मागणी केली होती. सोनिया गांधींशी थेट संवाद होत नव्हता. वेळ मिळत नव्हती. म्हणून आम्ही पत्र लिहिले होते. ते पत्र कोणीतरी फोडले. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. मात्र, ज्येष्ठ नेत्यांची मागणी मान्य करून निवडणूक जाहीर केल्यानंतर मी सोनिया गांधींचे आभार मी मानले.
अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. किंबहुना अध्यक्षपदाची निवडणूकही लढविणार नाही, असे स्पष्ट करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या घटनेनुसार निवडणूक व्हावी. लोकशाही पध्दतीने पक्ष चालावा, यासाठी कार्यकारिणीत नेमलेले लोक नसावेत, तर निवडून आलेले असावेत, अशी आमची भूमिका आहे. पक्ष मजबुतीने आणि लोकशाही पध्दतीने चालला पाहिजे. कारण, काँग्रेसच भाजपचा मुकाबला करू शकते.
बंडखोर अपात्र ठरतील
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात डबल इंजिन सरकार आहे. मात्र, अजुन पूर्ण मंत्रीमंडळ नाही. त्यामुळे पालकमंत्री नेमले नसावेत. आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर सुप्रीम कोर्ट देखील चालढकल करत आहे. तसेच 91 व्या घटना दुरूस्तीनुसार बंडखोर आमदार अपात्र ठरतील, असे मला वाटते. सरकारच राहणार नसल्यामुळे राज्यातील सरकारच्या हालचाली थंडावल्या.