पुणे-कसबा विधान सभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे असे विधानसभा निवडणुक प्रमुख आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या वेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, कसबा मतदार संघातील उमेदवार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, आर. पी. आय.(आठवले) पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण, रा. स. प. चे बालाजी पवार, शिवसंग्राम संघटनेचे भारत लगद. लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, पतीत पावन चे स्वप्नील नाईक, संदीप खर्डेकर उपस्थित होते.
सध्या पदयात्रेच्या माध्यमातून प्रचारावर भर देण्यात येत आहे असे नमूद करून त्यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यात जाहिर सभा आणि मेळावे यावर भर दिला जाणार आहे. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत सुनियोजित प्रचार चालू असून सर्व कार्यकर्ते एकदीलाने पूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत असे त्यांनी सांगितले.
याउलट महाविकास आघाडी पूर्ण गोंधललेली दिसत असून त्यांच्या नेत्यांमध्येच विसंवाद दिसत आहे. त्यांच्यातील सर्व स्तरावरच्या नेत्यांचे मतभेद रोज चव्हाट्यावर येत आहेत अशी टीका माधुरी मिसाळ यांनी केली.
पुणे शहरात केलेली विकास कामे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोचणार आहोत. कसबा मतदार संघ हा मध्य पुण्याचा भाग असून रहदारी, जुन्या वाड्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे हेमंत रासने यांनी सांगितले.