- प्रविण दरेकरांनी उघड केलेल्या प्रकरणावर सरकारचे आश्वासन.
मुंबई १० मार्च : महाराष्ट्र ग्रामोद्योग मंडळाच्या मालकीच्या बोरिवली येथील कोरा केंद्राच्या जागेचा दुरुपयोग करुन कोट्यवधी रुपये कमावत असल्याबाबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्याबाबत संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करु, हे प्रकरण कोर्टात असले तरी राज्याच्या महाधिवक्त्यांना सांगून तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करु आणि ही जागा शासनाच्या ताब्यात घेऊ, असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिले.
महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाची मालकी असलेल्या बोरिवली येथील कोरा केंद्राच्या 25 एकर जागेचा दुरुपयोग गणेश नायडू हा व्यक्ती अनधिकृतपणे करीत आहे, गरबा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांमधून कोट्यवधी रुपये स्वत: कमावतो आहे, सरकारला महसूल मिळण्याऐवजी नायडूसारख्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये जात आहेत, त्यामुळे नायडूसारख्यांना पाठीशी न घालता, ही जागा सरकारने ताब्यात घ्यावी, त्यामधून सरकारला मोठा महसूल मिळू शकेल, अशी सूचना दरेकर यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सरकारला केली होती.
आज विधान परिषदेत उप मुख्यमंत्री अजित पवार हे चर्चेला उत्तर देत होते, त्यावेळी त्यांनी दरेकरांच्या मुद्याची गंभीरपणे दखल घेऊन नायडूविरुध्द कारवाई करु, प्रकरण कोर्टात असले तरी महाधिवक्त्यांना सांगून तातडीने निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करु आणि ही जागा ताब्यात घेऊ, असे स्पष्ट आश्वासन सभागृहाच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांना दिले.