बंडखोर आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या उस्मानाबादेतील संपर्क कार्यालयाचा फलक फाडत शिवसैनिकांनी गद्दार सावंत, असा कार्यालयावर उल्लेख केल्यानंतर डॉ.सावंत यांच्या समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉ.सावंत समर्थकांनी तातडीने उल्लेख पुसून काढत कार्यालयाचे शुध्दीकरण केले. शिवसेनेचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बंडखोरी केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी पुण्यातील सावंत यांचे भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय फोडल्यानंतर उस्मानाबादेतील शिवसैनिकांनीही आनंद नगर भागातील संपर्क कार्यालयाचा फलक फाडला. तसेच डॉ.सावंत यांच्या कार्यालयाच्या शटरवर गद्दार शिवसैनिक, असा उल्लेख करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी डॉ.सावंत यांच्या विरोधात घोषणाही दिल्या. काही वेळातच डॉ.सावंत यांच्या समर्थकांचा दुसरा गट कार्यालयात आला.त्यांनी कार्यालयाचे शुध्दीकरण केले तसेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांचा निषेध करत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सुनावले. यावेळी शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष सूरज साळंुके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. सूरज साळंुके म्हणाले, वरच्या पातळीवर काही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद जरूर आहेत. मात्र,त्यामुळे डॉ.सावंत यांनी शिवसेना सोडली, असे म्हणता येणार नाही. ते आणि आम्ही शिवसेनेतच आहोत. डॉ.सावंत यांचा निषेध करणाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहेत,याची आम्हाला कल्पना आहे. त्यांची नावे आम्ही घेणार नाही. पण त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी उगीच उपद्रव करू नये,आपण एकाच ठिकाणी राहणार आहोत. अन्यथा आपल्याला जसाश तसे उत्तर मिळेल.