अबालवृद्धांनी लुटला ‘दिवाळी संध्या’चा आनंद
‘सुर तेच छेडिता’,’लतायुग’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे
सूर तेच छेडीता … आम्ही ठाकर … ठाकर, अश्विनी ये ना…,वल्हव रे नाखवा हो, सैराट झालं जी, जांभूळ पिकल्या झाडाखाली,मनाच्या धुंदीत उधळीत ये ना, शारद सुंदर चंदेरी राती, या जुन्या आणि नव्या मराठी गीतांचा मनमुराद आनंद लुटताना नागरिकांनी निःसंकोचपणे गाण्यांच्या तालावर ठेका धरत दिवाळीनंतरच्या सांगीतिक दिवाळीचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला.
निमित्त होते, आधार सेवा फाऊंडेशनतर्फे सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनी मैदानात आर्किटेक्ट हेमंत बागुल यांनी आयोजित केलेल्या दिवाळी संध्या संगीत महोत्सवाचे .दोन दिवस रंगलेल्या या दिवाळी संध्याचा शुभारंभ ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अभय महाजन, माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाला. यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई आबा बागुल, आयोजक हेमंत बागुल, श्रुतिका बागुल ,घनःश्याम सावंत ,नंदकुमार बानगुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंन्द्र भुरूक प्रस्तुत ‘सुर तेच छेडिता’ या जुन्या- नव्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कसदार गायन आणि दमदार वाद्यवृन्दाला दाद देताना रसिकांनी अनेक गाण्यांवर ठेकाही धरत ‘वन्समोअर’ चा आग्रहही केला.
‘लतायुग’मधून स्वरसम्राज्ञी लतादीदींना अभिवादन
चित्रपट सृष्टीत अनेक चेहरे बदलत गेले मात्र गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहिला. अशा या लतादीदींना दिवाळी संध्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या ‘लतायुग’ या विशेष कार्यक्रमातून त्यांच्या लोकप्रिय गीतांद्वारे अभिवादन करण्यात आले. संदीप पंचवाटकर निर्मित या कार्यक्रमात अजीब दास्ताँ है ये.. कहा खतम कहा शुरु, सोला बरस की बाली उमर को सलाम, मेघा रे मेघा मत परदेसी जा ,रात का समा झुमे चंद्रमा,फुल तुम्हे भेजा हैं खत में,तुझसे नाराज नहीं जिंदगी,तुझे देखा तो ये जाना सनम,बाहो में चले आओ…हम से सनम क्या परदा,यारा सिली सिली यासह अनेक गीते रेशमी मुखर्जी, गफार मोमीन, राजेश्वरी पवार,विवेक पांडे , कल्याणी देशपांडे यासह अन्य गायकांनी सादर केली. यावेळी स्व. लतादीदी यांच्या प्रत्येक शो मध्ये ३४ वर्षे साथ संगत करणाऱ्या विवेक परांजपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर एअर ब्रश स्प्रे पेंटींगद्वारे लतादीदींचे चित्र साकारणारे चित्रकार मिलिंद शिंपी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.