दुहेरीत देव जावीया व रोस्टीस्लाव गॅलफिंगर यांना, तर यु-युन ली व विपाशा मेहरा यांना विजेतेपद
पुणे, डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या भारताच्या देव जावीयाने दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरीत अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, दुहेरीत मुलांच्या गटात भारताच्या देव जावीया व कझाकस्तानच्या रोस्टीस्लाव गॅलफिंगर यांनी, तर मुलींच्या गटात तैपेईच्या यु-युन ली व भारताच्या विपाशा मेहरा या जोडीने विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या देव जावीया याने कझाकस्तानच्या तिसऱ्या मानांकित रोस्टीस्लाव गॅलफिंगर याचा 6-4, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 1तास 15मिनिटे चाललेल्या या सामन्यात देव याने रोस्टीस्लावची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत सातव्या गेममध्ये पुन्हा एकदा देवने रोस्टीस्लावची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देव याने रोस्टीस्लावला पुनरागमन करण्याची देखील संधी दिली नाही. 4-0अशा फरकाने आघाडीवर असलेल्या देवने सहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या वितेक होरक याने थायलंडच्या व अव्वल मानांकित पेटॉर्न हंचायकुल याचा 6-2, 6-4 असा सनसनाटी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात चीनच्या थियांमी मी हिने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या वैष्णवी आडकरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 10मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये 3-3 अशी स्थिती असताना थियांमीने वैष्णवीची आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये थियांमीने चतुराईने खेळ करत वैष्णवीविरुद्ध हा सेट 6-2 असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या लढतीत रशियाच्या अव्वल मानांकित मारिया शोल्कोवा हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत आठव्या मानांकित जपानच्या मई हासेग्वाचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित कझाकस्तानच्या रोस्टीस्लाव गॅलफिंगरने भारताच्या देव जावीयाच्या साथीत भारताच्या आर्यन भाटिया व उदयवीर सिंग या जोडीचा 6-1, 6-2 असा तर, मुलींच्या गटात तैपेईच्या यु-युन ली व भारताच्या विपाशा मेहरा यांनी रशियाच्या मारिया शोल्कोवा व जपानच्या किरारा मोरीओका यांचा 2-6, 7-6(8), 10-3 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेतील दुहेरी गटातील विजेत्या जोडीला 75 आयटीएफ गुण, तर उपविजेत्या 45आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सल्लागार समितीचे सदस्य निखिल रानडे, अजय कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर सुरजित बंडोपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले:
वितेक होरक(चेक प्रजासत्ताक)वि.वि.पेटॉर्न हंचायकुल(थायलंड)(1)6-2, 6-4
देव जावीया(भारत)(2)वि.वि.रोस्टीस्लाव गॅलफिंगर(कझाकस्तान)(3) 6-4, 6-1;
मुली:
मारिया शोल्कोवा(रशिया)(1)वि.वि.मई हासेग्वा(जपान)(8)6-4, 6-4;
थियांमी मी(चीन)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)6-3, 6-2;
दुहेरी गट: मुले: अंतिम फेरी:
रोस्टीस्लाव गॅलफिंगर(कझाकस्तान)/देव जावीया(भारत)(1)वि.वि.आर्यन भाटिया(भारत)/उदयवीर सिंग(भारत)(3)6-1, 6-2;
मुली:
यु-युन ली(तैपेई)/विपाशा मेहरा(भारत)(1)वि.वि.मारिया शोल्कोवा(रशिया)/ किरारा मोरीओका(जपान)(2)2-6, 7-6(8), 10-3.