पुणे ः राष्ट्र बलशाली बनवायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटक एकत्र आला पाहिजे. समाजासाठी काम करताना ते निरपेक्ष भावनेने केले पाहिजे. फक्त निवडणूकांच्या काळात एकत्र येण्यापेक्षा इतरवेळी देखील एकत्र आले पाहिजे. सर्व प्रथम राष्ट्र त्यानंतर समाज मग कुटुंब आणि स्वतःचा विचार केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अॅड. प्रशांत यादव यांनी व्यक्त केले.
जनता वेल्फेअर सोसायटी, पुणे व प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने बुधवार पेठेतील नामदेव शिंपी कार्यालयात आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जनता बॅंक पुणेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, उपाध्यक्षा अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, श्री नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष डाॅ. लक्ष्मण कालेकर, प्रभात जन प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, रुपेश नाईक, प्रतिष्ठानचे मंगेश शिंदे, राजेंद्र भुतकर, कृष्णा परदेशी, अक्षय चौहान, राजेश नाईक, ओंकार नाईक, कुणाल जगताप, सोसायटीचे अभय ढमाले, संभाजी कातुर्डे, आनंद पाटणकर उपस्थित होते.
यावेळी बुधवार पेठेतील देवदासी व देहविक्री करणाऱ्या महिलांना साखरेपासून साडीचोळी पर्यंत २० गोष्टींचा संच भाऊबीज ओवाळणी स्वरूपात भेट देण्यात आला. एकूण 50 महिलांना संचाचे वाटप करण्यात आले.
किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळी हा प्रत्येकाच्या घरात साजरा केला जाणारा सण आहे. या सणाला दिवाळीचा दिवा प्रत्येकाच्या घरात प्रकाशित झाला पाहिजे. या उद्देशाने देवदासी भगिनींसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
रविंद्र हेजीब म्हणाले, समाजाप्रती असणारे कर्तव्य आपण केले पाहिजे. छोट्या स्वरूपात का असेना प्रत्येकाने गरजूंना मदत केली पाहिजे. देवदासी महिलांना दिलेले हे संच म्हणजे मदत नाही तर ही संस्थेच्यावतीने दिलेली भाऊबीज आहे.