मुंबई-
जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याची आता राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांना याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी राज्य महिला आयोगाकडे जितेंद्र आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार केली आहे. तसेच, तक्रारदार महिलेवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिसांना गुन्ह्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, राज्य महिला आयोगास ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार,जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द आपल्या परिक्षेत्रातील मुंब्रा पोलीस ठाणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय सुडबुध्दीने दबावतंत्र वापरुन केला असल्याने सदरील गुन्हा रद्द करण्यात यावा व फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे.
आदेशात रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, विनयभंग प्रकरणी मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुध्द प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हींबाबीत सत्यता पडताळावी. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावा. ठाणे पोलिस आता राज्य महिला आयोगासमोर नेमका काय अहवाल सादर करणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.