पुणे दि.२५: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध करणे, गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबीरे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य असून त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यास मिळणार नाहीत. मोहिमेच्या माध्यमातून ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार असून ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक, पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही तात्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दवंडी देऊनही याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क करुन ई-केवायसीचे महत्व व कार्यपद्धती समजावण्यात येईल व मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, किंवा नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावरही याद्या उपलब्ध करुन देऊन त्याठिकाणी ई-केवासी पूर्ण करण्यास प्रवृत्त करण्यात येईल.
ई-केवायसी प्रकरणी संनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नेमण्यात आल्या असून प्रत्येक गावामध्ये सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहायकांना संबंधित गावात ई-केवायसीसाठी २९, ३० व ३१ ऑगस्ट रोजी विशेष शिबीरे घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या तिनही दिवशी संनियंत्रण अधिकाऱ्यांनी गावांमध्ये उपस्थित राहून ई-केवायसीचे काम १०० टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.