पुणे- सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज बी.आर.टी. मार्गावर रखडलेल्या कामांमुळे प्रवासी व पादचार्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरील कामे वेळेत पूर्ण करा, आठवड्याभरात कामाचा दर्जा सुधारा अशा सूचना सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आज संबंधित ठेकेदार व सल्लागाराला दिला.
स्वारगेट परिसरातील जेधे चौक ते कात्रज स्थानक या ६.२ किलोमीटर अंतरावर बी.आर.टी.च्या पुनर्रचनेचे काम चालू आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर श्री.भिमाले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज या मार्गाची पाहाणी केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पथ विभाग अधिकारी अभियंता श्री.विजयकुमार शिंदे, यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बी.आर.टी. मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक बसस्टॉपचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे, डिझाईन सदोष असून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, स्वारगेट, आदीनाथ सोसायटी, बिबवेवाडी परिसरात वाहनतळ, पदपथ याचे मार्किंग झालेले नाही, ठिकठिकाणी राडारोडा पडलेला आहे, स्वच्छतागृहांसाठी जागांची अजून निश्चिती झालेली नाही, दिलेल्या वेळेत काम पूर्ण होत नाही याबाबी श्री. भिमाले यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.पुढील तीन महिन्यात या मार्गाच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आले असून कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे आठवड्याभरात कामे वेळेत झाली नाहीत, कामात सुधारणा झाली नाही तर संबधित ठेकेदार व सल्लागारावर कडक कारवाई केली जाईल.
बीआरटी सेल लवकरच कार्यान्वित करणार
बी.आर.टी. मार्गासाठी पी.एम.पी. चा यापूर्वी स्वतंत्र बी.आर.टी. सेल होता. मधल्या काळात हा सेल बंद पडला होता. तो पुन्हा सुरू करावा यासाठी पी.एम.पी.एम.एल. संचालक मंडळात लवकरच प्रस्ताव मंजुर करून घेऊन, तो कार्यान्वित करणार आहे.