नदीपात्रातील रस्त्यातील अडथळे एक महिन्यात दूर करण्याचे आयुक्तांचे आदेश
पुणे-भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगर ला जाण्यासाठीचा पर्यायीरस्त्यातील वाहतुकीला होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश आयुक्त सौरव राव यांनी येथे दिले .आमदार विजय काळे आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या उपस्थितीत या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत महापालिका आयुक्तांनी अधिकारी,नागरिक ,आणि जमीन मालक यांची संयुक्तपणे घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले .
कर्वे रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी बाबा भिडे पुलाकडून नदीपात्रातील रस्त्याने कोथरूड कर्वेनगर ला जाण्यासाठीचा पर्यायी रस्ता म्हणून दुचाकीस्वार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात.मात्र हा रस्ता रजपूत वीटभट्टी जवळ अत्यंत अरुंद होतो आणि रोज संध्याकाळी येथे वाहतूक कोंडी होते ज्याचा स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना ही प्रचंड त्रास होतो.स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून २४ डिसेंबर रोजी भैरवनाथ मंदिराकडून (मेहेंदळे गॅरेज चौकातून ) नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्थानिक नागरिक तसेच येथील जमीन मालक प्राची शहा यांनी या समस्येबाबत ची माहिती दिली व प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन ही दिले.यानंतर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आमदार विजयराव काळे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याविषयी जमीनमालक व स्थानिकांची भूमिका सांगितली.
यानंतर आमदार विजयराव काळे यांनी या विषयावर आज महापालिकेत बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर,पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर,डी पी चे राजेंद्र राउत,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक आदित्य माळवे,भाजप उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,जमीन मालक प्राची शहा व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पुढे काहीच न झाल्याबद्दल आमदार काळे यांनी नाराजी व्यक्त केली व रस्त्याचे महत्त्व समजून घ्यावे व युद्धपातळीवर हे काम केले जावे असे सांगितले.प्राचीताई शहा आणि संदीप खर्डेकर यांनी ” हा रस्ता डी पी त दर्शविल्याप्रमाणे १५ मीटर केल्यास काही घरांचे पुनर्वसन करावे लागेल व येथे एस आर ए होण्यास अडचणी निर्माण होतील हे निदर्शनास आणून दिले.” यावर आयुक्त सौरभ राव यांनी ” हा रस्ता करण्यासाठी येथील सर्व अडथळे दूर करण्यात यावे असे स्पष्ट आदेश देताना त्यासाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित केला.आमदार विजय काळे यांनी येथील रहिवाशांचे योग्य पुनर्वसन व्हावे व येथील एस आर ए स्कीम ही मार्गी लागावी यासाठीचा आराखडा तयार करावा आणि लवकरातलवकर येथील वाहतूक कोंडीतून सामान्यांची सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यास प्राची शहा यांनी ही संमती दर्शविली व सुधारित आराखडा दाखल करु व या महत्त्वाच्या १५ मीटर रस्त्याच्या पूर्ततेसाठी सहकार्य करु असे सांगितले.
आमदार विजय काळे यांची शिष्टाई सफल झाली असून त्यांनी सर्वसमावेशक तोडगा काढला आणि सर्वांचे एकमत घडवून आणले असल्याने ८ वर्षे प्रलंबित असलेला विषय मार्गी लागेल असा विश्वास स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.तसेच आपण कोथरूड च्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून आता ह्या विषयाचा दैनंदिन पाठपुरावा करणार असून लवकरच हा रस्ता होइल आणि कोथरूडकरांची एक मोठी समस्या सुटेल असेही त्या म्हणाल्या.