पुणे : ‘एआयसीटीई-सीआयआय सर्व्हे ऑफ इंडस्ट्री-लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स २०१६’ या सर्वेक्षणाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन’ (एसआयएमएमसी) या संस्थेची सलग दुसऱ्या वर्षी प्लॅटिनम श्रेणीसाठी निवड झाली आहे. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात १६० सुस्थापित व्यवस्थापन संस्था सहभागी झाल्या होत्या.
सर्वेक्षणात निवडीसाठी अभ्यासक्रम, शिक्षक, प्रशासन, पायाभूत सुविधा, नोकरीची संधी व सेवा/प्रकल्प कौशल्ये हे निकष विचारात घेतले गेले. संस्थांनी उद्दिष्ट्य साध्य केल्याच्या गुणांकनावर आधारित त्यांची राष्ट्रीय पातळीवर वर्गवारी करण्यात आली. व्यवस्थापन संस्थांची वर्गवारी प्लॅटिनम, गोल्ड व सिल्व्हर अशा तीन स्वतंत्र श्रेणींत केली गेली.
प्लॅटिनम श्रेणीतील संस्था आपल्या अभ्यासक्रमाद्वारे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक सहलींच्या आयोजनाद्वारे उद्योगांशी जोडल्या गेल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. या संस्थांतील लक्षणीय संख्येने शिक्षकांना उद्योगांकडून प्रशिक्षण मिळाले आहे, मात्र अशा स्वरुपाचा शिक्षक-उद्योग सहयोग सिल्व्हर श्रेणीतील संस्थांमध्ये आढळलेला नाही.
प्लॅटिनम श्रेणीतील संस्थांना त्यांची केंद्रे व विभागांच्या खर्चासाठी उद्योग क्षेत्राकडून निधी मिळण्याची जास्त शक्यता आहे, तसेच या संस्थांना त्यांच्या प्रशासक मंडळांत अथवा सल्लागार परिषदांत उद्योगाला समाविष्ट करुन घेण्याचीही अधिक शक्यता असते आणि नोकऱ्या मिळवून देण्यातील यश त्या आपल्या विद्यार्थ्यांपुढे मांडू शकतात, असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
या निवडीबाबत आनंद व अभिमान व्यक्त करताना ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, पुणे’चे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, की ‘एआयसीटीई-सीआयआय सर्व्हे ऑफ इंडस्ट्री-लिंक्ड इन्स्टिट्यूट्स २०१६’ सर्वेक्षणाने सलग दुसऱ्या वर्षी प्लॅटिनम श्रेणी देऊन भारतातील आघाडीच्या २१ व्यवस्थापन संस्थांत गणना करणे, आमच्यासाठी खरोखर गौरवपूर्ण आहे. आमचे सर्व शिक्षक, कर्मचारी व सहयोगी यांचा सक्रिय पाठिंबा व समरसता यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.