कोल्हापूर “एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय?” असा सवाल सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.“शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते दृश्य अतिशय भयावह होतं. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात बोलताना म्हणाले. तसेच काल घडलेल्या घटनेचे मास्टरमाईंड नागपुरात बसलेले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता. त्यावर बोलताना “आपण अशा लोकांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत,” असं फडणवीसांनी म्हटलंय.
याशिवाय, शुक्रवारी शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत हल्ल्याचा निषेध दर्शवला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले होते.