श्री शिवाजी कुल संस्थेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कुलरंग महोत्सव उद््घाटन, त्रैमासिक प्रकाशन व उत्कृष्ट कुलवीर पारितोषिक प्रदान
पुणे : खेळाचे शिक्षण हे अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. अभ्यासाप्रमाणे खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. अभ्यासामुळे आपण बुद्धीमान होतो. मात्र, खेळामुळे मानसिक व व्यक्तिमत्व विकास होतो. मैदानावरील खेळाचे शिक्षण हे आयुष्यभर पुरणारे शिक्षण असून हे शिक्षण देणारी स्काऊट चळवळ ही भिंतीबाहेरची सर्वोत्तम शाळा असल्याचे मत प्रख्यात लेखिका डॉ.संगीता बर्वे यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी प्रसिद्ध चित्रकार राहुल देशपांडे, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम, यश गुजराथी, सानिका काकडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
महोत्सवात उद््घाटनप्रसंगी संस्थेच्या कुलवार्ता या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कब शार्दुल राजूरकर, उत्कृष्ट बुलबुल जिया सखरानी, उत्कष्ट स्काऊट सक्षम वाईकर, उत्कृष्ट गाईड स्वरा पवार, उत्कष्ट अधिकारी साक्षी वाडकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच तब्बल ५० वर्षांपूर्वी कुलमुख्य असलेल्या आणि आजही कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, योगिनी जोगळेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
राहुल देशपांडे म्हणाले, पुस्तक वाचन, कविता वाचनासोबत आपण चित्र बघायला देखील शिकले पाहिजे. आपल्या आजूबाजूचे किल्ले, मंदिरे यांना भेट देताना केवळ सहल म्हणून नाही, तर त्यांचा अभ्यास करीत इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. त्यावरुन स्वत: ती चित्रे रेखाटावी. आपल्या येथे अनेक प्रकारची संग्रहालये देखील आहेत, तो आपला ठेवा असून ती देखील अभ्यासपूर्ण पद्धतीने पहा, असा सल्ला त्यांनी मुलांना दिला. धनश्री देवधर, किर्ती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र धायगुडे यांनी आभार मानले.