प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ; राज्यस्तरीय चौथ्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे : भूकंप किंवा पूर व्यवस्थापनाचा प्रकल्प… दूषित पाणी शुध्द करणारी यंत्रणा… स्मार्ट सिटी कशी असावी याची प्रतिकृती…उर्जा प्रकल्पाची माहिती घेणारे विद्यार्थी…रसायनांचे रासायनिक प्रक्रियेचे रहस्य अशा विविध मॉडेल्समधून विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या दुनियेची अनोखी सफर अनुभविली. नवनवीन विज्ञान प्रयोगांची माहिती देखील उपस्थितांनी अगदी उत्सुकतेने घेतली.
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘चौथ्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले. यावेळी आयआयटीएमचे प्रकल्प संचालक डॉ.बी.एस.मूर्ती, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात २०० हून अधिक प्रकल्पांचा समावेश होता. ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावी, अकरावी ते बारावी आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटात घेण्यात आली.
सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इटस् इफेक्ट अँड रेमिडीज, ह्युमन बायोलॉजी अँड गेल्थ, आॅटोमेशन इन अॅग्रीकल्चर, क्लिन अँड ग्रीन इन्व्हार्नमेंट, क्लायमेट क्रायसिस अँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण केले.
डॉ.बी.एस.मूर्ती म्हणाले, पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. तापमानवाढ आणि हवामानातील बदल यांचे अनेक परिणाम सध्या होत आहेत. मानवाची राहण्याची पद्धती व त्यामधील अमूलाग्र बदल हे देखील संतुलन बिघाडाचे एक कारण आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर असून हे टाळण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवेत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जावा, याकरीता या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थीमधील विज्ञानबद्लचे कुतूहल निर्माण होते, त्यामुळे त्यांच्यातील संशोधन वृत्तीस देखील चालना मिळते. विद्यार्थीदशेतच मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, याकरीता असे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे.