नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करणार – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
पुणे-
नदीपात्रातील रस्त्याचा हजारो दुचाकीचालक वापर करत असून सदर रस्ता राजपूत वीटभट्टी वसाहती जवळ अत्यंत अरुंद झाला आहे.कर्वे रस्त्यावरील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असून येथे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच स्थानिक नागरिकांना ही या वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागतो.यासाठी मी यात लक्ष घातले असून हा रस्ता रुंद करण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.त्यातील अडथळे दूर होणे शक्य नसल्यास हा रस्ता म्हात्रे पुलाखालून डी पी रस्त्याला जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे ही त्या म्हणाल्या.त्यांच्या विकास निधीतून महादेव मंदिर चौक (भैरवनाथ मंदिर ) ते राजमयुर सोसायटी या नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन उद्योजिका प्राचीताई शहा,चित्रसेनदादा खिलारे आणि युवा सेनेचे शहर प्रमुख किरण साळी यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी स्थानिक नगरसेवक जयंत भावे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,शंतनू खिलारे,बाळासाहेब धनवे,सुभाष ढावरे,सुवर्णाताई काकडे,हेमंत भावे,संगीताताई शेवडे,नितीन शिंदे,प्रशांत कदम,तेजस वाशीवले,किरण देखणे,महेश चव्हाण इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्योजिका प्राची शहा म्हणाल्या ” ही सर्व जागा आमच्या मालकीची असून येथे नदीपात्राकडे जाणारा रस्ता हा विकास आराखड्यात १५ मीटर दर्शविण्यात आला आहे,तर महादेव मंदिर चौकापासून राजमयुर सोसायटी पर्यंतचा रस्ता २४ मीटर दर्शविण्यात आला आहे. येथील नागरिकांनी त्यास आक्षेप घेतल्यानंतर ही त्याची दखल घेतली गेली नाही व त्यामुळे हा रस्ता रखडला आहे.नदीपात्र ते प्लॉट नंबर १४ हा बोळ वजा अरुंद रस्ता १५ मीटर दर्शविण्यात आला आहे,सदर रस्ता ब्ल्यू लाईन मधे येत असून तो ९ मीटर चा केल्यास आम्ही आमची जागा देण्यास तयार होतो.मात्र ७ वर्ष पाठपुरावा करुन ही न्याय मिळाला नाही.
महादेव मंदिर चौक ते प्लॉट नंबर १४ हा रस्ता २४ मीटर होणे सद्यस्थितीत अशक्य आहे,त्याच्या दोन्ही बाजूस इमारती झाल्या आहेत,आता विकास आराखडा ही अंतिम झाल्याने त्यात बदल अशक्य आहे मात्र याबाबतीत मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागून विशेष बाब म्हणून हा प्रश्न सोडवावा यासाठी प्रयत्न करु असे भाजप उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन,शंतनू खिलारे यांनी स्वागत तर बाळासाहेब धनवे यांनी आभार प्रदर्शन केले.