शिक्षणातील डिजिटायजेशन विषयावर कार्यशाळा
रोटरी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम
पुणे – विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शालेय स्तरापासूनच त्यांच्यातील कौशल्यांना चालना देणे आवश्यक आहे, असे मत दिल्ली येथील एफ टेक स्किल डेव्हलपमेंटचे कार्यकारी संचालक मल्लिकार्जुन यांनी व्यक्त केले.
रोटरी 3131 च्या क्लब ऑफ पुणे मेट्रो व हेरीटेज आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने बाल शिक्षण मंदिर, कोथरूड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘तंत्रज्ञान व कौशल्य विकास’ या विषयावर मल्लिकार्जुन बोलत होते.
या कार्यक्रमाला रोटरी इंडिया मिशनचे पदाधिकारी रो. देवांगठाकूर, दीपक शिकारपूर, वैशाली भागवत, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष संजय इनामदार, सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, शिक्षणाधिकारी शेख, अत्तार, आदी उपस्थित होते.
आज शिक्षण क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. शिक्षकांना याची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे रोटरीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संगणकाच्या मदतीने शिकवण्यासाठी शिक्षक प्रथम संगणक शिक्षित हवा. त्यासाठी शिक्षकांनी हे नवीन तंत्रज्ञान आपलेसे केले पाहिजे. यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, २०२१ मध्ये आपल्या शाळा कशा असाव्यात, याचे प्रशिक्षण देण्यासाठी MKCL चे संचालक विवेक सावंत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित शिक्षकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी विवेक सावंत यांची ओळख करून देताना, सावंत यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणासाठी केलेल्या कामाची माहिती शिक्षकांना दिली.
या कार्यशाळेला ४०० हुन अधिक शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन रोटरी मेट्रोचे अध्यक्ष शार्दूल गांधी आणि आभार प्रदर्शन रोटरी हेरिटेजचे अध्यक्ष जयवंत शिंत्रे यांनी केले.