पुणे–
” क्रीडा-स्पर्धांमध्ये हार-जीत होतच असते मात्र जिंकण्याची उमेद सतत जागृत ठेवल्यास विजयाचे ध्येय सहज गाठता येऊ शकते असे विचार सुप्रसिद्ध नेमबाजपटू अंजली भागवत यांनी येथे व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर तर्फे ‘रोल बॉल’ या खेळाचे जनक श्री. राजू दाभाडे यांना यंदाचा ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ऑलिम्पिक रायफल शुटिंग खेळाडू व रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. प्रशांत देशमुख तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे प्रेसिडेंट श्री. शिरीष मंदसोरवाले आदी उपस्थित होते.
अंजली भागवत यांनी आपल्या भाषणात राजू दाभाडेंचे कौतुक करताना हा खेळ आता ऑलिम्पिकसाठी मान्यताप्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. सध्या या खेळातील विश्वविजेता असलेला आपल्या भारत देशाचा संघ ऑलिम्पिकचे पदकही घेऊन येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. राजू दाभाडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना ‘रोल बॉल’ या खेळाविषयीची माहिती दिली. भारताचा मुलांचा आणि मुलींचा संघ या खेळात विश्वविजेता असल्याचे अभिमानाने नमूद केले.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरचे प्रेसिडेंट श्री. शिरीष मंदसोरवाले यांनी ‘रोल-बॉल’ खेळाचा इतिहास सांगताना हा खेळ ५० देशांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी अल्पकाळात चार वर्ल्ड-कप स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल राजू दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली. नुकत्याच ढाका (बांगला देश) येथे झालेल्या चौथ्या वर्ल्ड-कप स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अजिंक्यपद मिळविले त्यानिमित्त या संघांचे कप्तान आदित्य गणेशवाडे व ऐश्वर्या सावंत तसेच दोन्ही संघांतील इतर खेळाडूंचा याप्रसंगी मानपत्र देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत देशमुख यांनीही, रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगरचे कौतुक करताना या क्लबने या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले हे पाऊल प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा पुराणिक यांनी केले. तर मानपत्राचे वाचन सोनाली मोकाशी यांनी केले. संगीता नानीवडेकर यांच्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सेक्रेटरी राजन पाटील आणि आशा आमोणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिरीष पुराणिक यांनी आभार मानले.
जिंकण्याची उमेद सतत जागृत ठेवा – अंजली भागवत
Date: