पुणे : पुणे परिमंडल अंतर्गत नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील राष्ट्रीय महामार्गावरील ओव्हरहेड ६० मीटर लांबीची रोडक्रॉस वीजतार अवघ्या दहा मिनिटात बदलण्याची जिगरबाज कामगिरी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी केली.
याबाबत माहिती अशी की, कामथडी अतिउच्चदाब १३२ केव्ही उपकेंद्रातून वर्वे २२ केव्ही वीजवाहिनीद्वारे नसरापूरसह परिसरातील १२ गावांना वीजपुरवठा केला जातो. ही वीजवाहिनी नसरापूरजवळील राष्ट्रीय महामार्गावरून गेलेली आहे. रविवारी (दि. १५) पहाटे ४.४५ वाजता वर्वे वीजवाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर बिघाड शोधण्यासाठी महावितरणकडून लगेचच लाईन पेट्रोलिंग सुरु करण्यात आले. यामध्ये महामार्गावरून गेलेल्या ओव्हरहेड वीजवाहिनीमधील तीनपैकी एक तार (कंडक्टर) तुटून गार्डनिंगमध्ये अडकल्याचे सकाळी ६.३० वाजता दिसून आले.
महावितरणकडून सर्वप्रथम रोडक्रॉसींगच्या भागातील केवळ दोन उच्चदाब व ४ लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेऊन या वीजवाहिनीवरील नसरापूरसह सर्वच १२ गावांचा वीजपुरवठा सकाळी ६.३० वाजता सुरु करण्यात आला. त्यानंतर वीजवाहिनीची तुटलेली तार दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले. या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची गरज होती. त्यासाठी केवळ १० मिनिटांची परवानगी मिळाली. सकाळी १०.३५ वाजता महावितरणचे ४ अभियंते, २२ कर्मचाऱ्यांनी वाहतुकीचा वेग मंदावल्यानंतर युद्धपातळीवर वेगवान दुरुस्ती काम सुरु केले. यामध्ये एका उंच कंटेनरवर शिडीच्या सहाय्याने गार्डनिंगमधील जुनी तार काढून लगेचच नवीन तार बसविण्यात आली. अवघ्या १० मिनिटांत ही कामगिरी फत्ते झाली. त्यानंतर उर्वरित सहा ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.
राष्ट्रीय महामार्गावरील रोडक्रॉस वीजतारेची अतिशय वेगवान व आव्हानात्मक दुरुस्ती कामात नसरापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. नवनाथ घाटुळे, सहायक अभियंता तुषार क्षीरसागर, निखील कोंढूरवार, अभिजित भोसले यांच्यासह १२ जनमित्र व मेसर्स अग्रवाल कंत्राटदारांचे १० कर्मचारी सहभागी झाले होते.