नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022
भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची नियुक्ती ही संघटनात्मक आवश्यकता, लढण्याची क्षमता, लढाऊपणाची परिणामकारकता आणि भारतीय लष्कराची कार्यक्षमता यावर आधारित केली जाते. भारतीय सैन्याने लिंगाधारित समानता निर्माण करण्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.
- अखिल भारतीय स्तरावर गुणवत्तेच्या आधारावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये महिलांचा समावेश केला आहे. या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण 2022 च्या शरद ऋतूपासून सुरू झाले आहे.
- लष्करी पोलिसांच्या ‘कॉर्प्स’मध्ये म्हणजेच तुकडीमध्ये 100 महिलांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. कॉर्प्समध्ये 1,700 महिलांना टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेण्यात येणार आहे.
- लष्करी वैद्यकीय तुकडी आणि दंत वैद्यकीय तुकडी वगळता लष्कराच्या 10 शाखांमध्ये 620 अल्पकालीन सेवेतल्या (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात आली आहे.
स्त्री-पुरूष असा भेदभाव केला जाऊ नये म्हणून प्रोत्साहन : स्त्री-पुरूष असा भेदभाव केला जाऊ नये, यासाठी ‘करिअर प्रोग्रेशन’ धोरण 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना समानता कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा पैलूंचा समावेश आहे. या धोरणामुळे महिला अधिकार्यांना सशस्त्र दल/सेवांमध्ये उच्च पदावर पदोन्नतीसाठी समान संधी प्रदान केली आहे. यामुळे भविष्यात भारतीय सैन्यात उच्च पदापर्यंत पोहोचून, नेतृत्वाची भूमिका पार पाडणा-या महिलांचा सहभाग वाढेल.
अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरामध्ये दिली.