पुणे : एक हजार शालेय बसगाड्यांचे वाहनचालक यांना शिधा कीट आणि एक हजार रिक्षाचालकांना सीएनजीसाठी ५०० रुपयांच्या कूपन्सचे वाटप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी करण्यात आले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने भारत फोर्जच्या सामाजिक दायित्व निधीतून आणि माया सेवा संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी भाजपचे नेते, कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी या मदतकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लसीकरण, निर्जंतुकीकरण, शिधावाटप अशा मदतकार्याची माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. यापुढेही मदतकार्य चालू ठेवले जाईल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी, सर्वश्री दत्ता खाडे, रविंद्र साळेगावकर, प्रतुल जागडे, गणेश बगाडे, आनंद छाजेड आदी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.