ब्रँड बाजा बारात मधून उलघडणार लग्नाबद्दलच्या नव्या संकल्पना.
दोन पिढ्यांचा विचार, संकल्पना आणि भावना मांडणारे नाटक ब्रँड बाजा बारात
पुणे-राजा परांजपे प्रोडक्शन्सचे नवीन दोन अंकी नाटक अर्थात ब्रंड बाजा बारात रंगभूमीवर आले आहे. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंच येथे ह्या नाटकाचे सादरीकरण होईल. आणि १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे देखील नाटकाचे सादरीकरण होईल. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची घटना असते. “अरे, असा वागशील तर कोणी मुलगी कशी देईल?” “झालीस न आता २५ ची लाडू कधी मग आता?”, “इकडेच अशी वागशील तर सासरी काय करणार?” हे आणि असे काही संवाद आपण आजूबाजूला नेहमीच ऐकतो. लग्न हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो.
पण ज्याप्रमाणे काळ बदलतो त्याच प्रमाणे पद्धतीपण बदलतात. आजकाल प्रत्येक गोष्टींचे सोहळ्यात रूपांतर होत आहे. त्यातून लग्न ह्या संस्काराचेही आजकाल ब्रंडिंग होऊ लागले आहे. मग पंगतीचे बुफे मध्ये रुपांतर होणे असेल किंवा आमंत्रण पत्रिकांचे व्हाट्स एप इन्विटेशन होणे, हे सगळे त्याचेच प्रकार. कालानुरूप काही गोष्टी बदलतात. पुढची पिढी कालानुरूप स्वतःत बदल घडवत जाते पण जुनी पिढी मात्र काही गोष्टी संस्कार भावना म्हणून धरून ठेवतात आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत सुवर्णमध्य काढून दोन्हीपिढ्या एकमेकांचा हात हातात घेऊन सुखाने नांदतात. याच धर्तीवर आधारित आहे, हे नवीन नाटक ब्रंड बाजा बारात. ‘अंकुर’, ‘आम्ही मराठी’ अशी आशयघन नाटके देणाऱ्या लेखक दिग्दर्शक जोडगोळीने हे नवीन नाटक रसिकांसमोर आणले आहे. लेखक अक्षय जोशी याने लिहिलेले हे नाटक दिग्दर्शक अर्चना राणे यांच्या संकल्पनांवर आधारित आहे.
एक मुलगी आणि तिच्या वडिलांमधील निखळ संवाद म्हणजे हे नाटक. पुढे काय होणार हा विचार प्रेक्षकांना करायला लावत हे नाटक पुढे सरकते. दोन पिढ्यांच्या विचारधारा, स्पष्ट मते ती मांडताना असणारे दुसर्या पिढीबद्दलचे प्रेम, भावनिक नातेसंबंध ह्या नाटकातून मांडण्यात आले आहे. मुलीचे लग्न हा प्रत्येक बापासाठी अत्यंत महत्वाचा विचार असतो. बर्याचदा मुलीने विशी गाठली कि प्रत्येक बापाचे त्याअनुशंघाने प्लॉनिंग सुरु होते आणि खऱ्या अर्थाने भावनिक उहापोह देखील सुरु होतो. मुलीचे देखील त्यासंबंधी वेगेळे विचार सुरु होतात. नव्या पिढीकडे असलेली विचारांची स्पष्टता बर्याचदा काही गोष्टी सोयीस्कर करून टाकतात. दोनही पिढ्यांचे विचार समाजातील होत जाणारे बदल अधोरेखित करत शेवट गोड करून प्रेक्षकांची निखळ करमणूक करतात. रंगमंच्यावर बाप लेकीची जुगलबंदी सादर करणारे कलावंत आहेत श्रुती अत्रे आणि अतुल कासवा. श्रुती अत्रे हिला आजवर आपण झी युवाच्या बनमस्का या मालिकेतून पाहिले आहे तर अतुल कासवा यांनी आजवर झी मराठीच्या उंच माझा झोका दिल दोस्ती दुनियादारी तसेच सोनीच्या क्राईम पेट्रोल स्टार प्रवाहाच्या नकुशी अश्या कार्यक्रमातून पाहत आलो आहोत.
साधारण लग्नाळू मुलींच्या बापाला जी शंका येऊ लागते कि ‘हिचे कुठेतरी जमले आहे’ या संशयाने नाटकाची सुरुवात होते. आणि तिच्याकडून माहिती घेत असताना बाप स्वतःची देखील कहाणी सांगू लागतो. बाबांच्या वेळची हूरहूर, रुसवा, नातेसंबंध याविषयी बाबा सांगू लागतात आणि हे प्रसंग रसिकांसमोर फ्लॉशबॅक तंत्राने येतात आणि ह्या गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या आठवणींशी जोडतात. संगीत ही कला प्रत्येकाला भावते, या नाटकात असणारी गाणी नेमके हेच उद्दिष्ट साध्य करतात, आणि ते उत्तम सादर करण्याचे काम पार पडतात आजच्या पिढीतील सुरेल गायक धवल चांदवडकर आणि रमा कुलकर्णी. शास्त्रीय रागदारीत असलेली गाणी असल्याने तरुण पिढी संगीत नाटकापासून लांब जात असताना, त्यांना आवडणारे संगीत नाटकात आणून त्यांनाही या कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अर्चना राणे यांनी केलेला आहे. तर या गाण्यांवर उत्तम सादरीकरण बसवण्याची कामगिरी पडली आहे ती अनघा हरकरे आणि पायल जाधव यांनी. कधी कल्पना, कधी भूतकाळातील प्रसंग कधी उद्विग्न भावना तर कधी प्रेमळ अनुभव अश्या भावनांना त्यांनी रसिकांसमोर आणले आहे. त्यास पार्थ राणे, अमेय बर्वे, अनघा हरकरे आणि पायल जाधव यांनी उत्तम साथ दिली आहे. तसेच तांत्रिक गोष्टींसाठी नेपथ्य सुरेश चौधरी अजिंक्य माने, संगीत संयोजन अजिंक्य माने, प्रकाश योजना सचिन लेले, ध्वनी निलेश यादव यांनी साथ दिलेली आहे.
एकूणच, एक उत्तम कलाकृतीची निर्मिती अर्चना राणे यांनी राजा परांजपे प्रोडक्शन्स च्या माध्यमातून निर्मिली आहे. तसेच या नाटकाला महाराष्ट्र शासनाचे व्यावसायिक नाटकासाठीचे अनुदानही नुकतेच जाहीर झाले आहे. म्हणजेच समीक्षकांनीही यास त्यांची पोचपावती दिलेली आहे. सदर नाटकाचे प्रयोग आता महाराष्ट्रात चालू असून रसिकांनी त्यांच्या पसंतीची पोचपावती दिलेली आहे. रसिकांनी त्याच्या प्रयोगांना हजर राहून एका चांगल्या आणि टवटवीत कलाकृतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन दिग्दर्शिका अर्चना राणे यांच्याकडून करण्यात आले आहे.