पुणे- एखाद्याची मुलाखत घेताना मुलाखतकाराच्या विचारात स्पष्टता, देहबोली आणि वाचणाबरोबरच
त्याने उत्तम श्रोता असणे आवश्यक आहे असे मत प्रसिध्द निवेदक व मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी
व्यक्त केले. मराठी भाषा जपल्यामुळेच आपल्याला जगभरात फिरता आले असेही ते म्हणाले.
‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’तर्फे महाकवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी)यंदाचे ‘माध्यम
रत्न’पुरस्कार’ चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाईम्स ), हलिमाबी अब्दुल कुरेशी (बी.बी.सी.वर्ल्ड न्यूज –
मराठी) आणि दीपा भंडारे (आकाशवाणी) यांना सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी
ते बोलत होते.’पत्रकार भवन’नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.. ५००० रुपये रोख, स्मृतीचिन्ह,
शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच ‘नाद-संवाद’ या प्रामुख्याने कलावंताच्या छोट्या
मुलाखतींवर आधारित तन्मयी मेहेंदळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही संपन्न झाले. तिला देखील
प्रतिष्ठानतर्फे पाच हजार रुपये, शाल श्रीफळ देऊन गौरविले गेले. श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापडचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, ‘मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे हे
मंचावर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ म्हणाले, मुलाखत घेणाऱ्याचे भान पक्के असावे लागते. त्यासाठी माणसे आणि पुस्तके
वाचावी लगतात. कधी संधी येईल हे सांगता येत नाही. २४ तास सतर्क राहणे ही बोलणाऱ्या माणसाने
लक्षात ठेवण्याची बाब आहे असे नमूद करून गाडगीळ म्हणाले, मुलाखत घेताना समोरच्याच्या मनातून
तुम्हाला काय काढून घ्यायचे आहे याची रूपरेषा तयार असायला हवी. माध्यमांच्या स्वरूपात झालेले बदल
आणि मुलाखत घेताना आलेला आक्रमकपणा यामुळे कदाचित जास्त प्रसिद्धी मिळत असेल परंतु संयम
व बोलण्यातील नम्रपणा हा मुलाखतकाराने ठेवलाच पाहिजे असेही ते म्हणाले. ज्याची मुलाखत घ्यायची
आहे त्याने काही कर्तुत्व केले आहे, आपण त्याला बोलावले आहे याचे भान आपले ठेवले पाहिजे. प्रश्न
विचारण्याच्या नादात मुलाखतकाराने अकारण आक्रमक होणे आवश्यक नाही. ज्याची मुलाखत घ्यायची तो
खोटे बोलत असेल, नाठाळपणे उत्तरे देत असेल तर त्याला खट्याळपणे प्रश्न विचारून त्याची जागा त्याला
दाखवून देता येते असे त्यांनी सांगितले. मी मराठी भाषा जपली. मराठी भाषेच्या माध्यमातून शांघाय,
अमेरिकेतील ५१ शहरे,युरोप असे जगभर मला फिरता आले. मराठी भाषा जपल्यामुळेच ही संधी
मिळाल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.
सुरेश कोते म्हणाले, संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी त्यांच्या विचारातून , भजनातून लोकांना विचार
दिले. पुढे वारकरी सांप्रदायाने मराठी भाषा जतन करण्याचे काम केले आहे. एकवेळ शिकलेल्या
माणसांकडून माणसांकडून मराठीचे जतन झाले नाही परंतु ग्रामीण भागातील जनतेचे वाचन कमी असले
तरी त्यांचे श्रवण जास्त असल्याने त्यांनी मराठी भाषेचे संगोपन केले. मराठी जगवायची असेल तर
जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मराठीचे संगोपन व्हायला हवे असेही त्यांनी नमूद केले.
चैत्राली चांदोरकर म्हणाल्या, पुण्यातील माध्यमांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या ४० टक्केपेक्षा
जास्त आहे. ‘आयडब्ल्यूएमएफ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जगभरात माध्यमांमध्ये काम करणाऱ्या
महिलांचे प्रमाण हे ३३ टक्के आहे. युरोप, अमेरिका यासारख्या विकसित देशात हे प्रमाण २० टक्के आहे.
आपल्याकडे अजूनही संधी उपलब्ध असून हे प्रमाण ६० टक्क्यापर्यंत जाऊ शकते. मराठी माध्यमांमध्ये
तरुणींनी मोठ्या प्रमाणात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हलीमाबी कुरेशी म्हणाल्या, मराठी भाषेबद्दल बोलताना प्रमाण भाषा की बोली भाषा असा वाद निर्माण
होतो. मात्र, हा वाद नसून त्या दोघी बहिणी आहेत असा दृष्टीकोन असायला हवा. आपण ज्या भागात
राहतो, वावरतो ती भाषा आपल्याला येणे आवश्यक आहे असे सांगून पंढरपूरच्या वारीमुळे आपला
पत्रकारीतेते येण्याचा उद्देश सफल झाला असे त्या म्हणल्या. मराठी भाषा आपल्या विचाराने, लिहिण्याने
आणि बोलण्याने कशी समृध्द करता येईल याचा चिचार होणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.
दीपा भंडारी म्हणाल्या, मराठी भाषा समृद्धीच्या प्रवासामध्ये आपल्याला आकाशवाणी , वृत्तपत्रे या
माध्यमांचा उपयोग झाला. तसेच मराठीमुळे आत्मविश्वासातहे भर पडली. संत साहित्य आणि आधात्म्य
याचे खूप वाचन केल्यामुळे माझे मराठी लिखाण अधिक समृध्द होत गेले असे त्या म्हणाल्या.
तन्मयी मेहेंदळे मेहेंदळे म्हणाल्या, विविध माध्यमांमधून मला लिखाण करता आले त्याच्या निवडक ४२
मुलाखतींचे पुस्तक मला करता आले. प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. तो काही ना काही लिहू
शकतो या माझ्या आतापर्यंतच्या गुरुजनांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे माझे पहिले पुस्तक मी लिहू
शकले. आजोबा आणि आईवडिलांचे संस्कार यामुळे मराठी भाषा अधिक शुध्द स्वरूपात वापरण्याची सवय
मला जडली असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रवीण प्र.वाळिंबे म्हणाले, की गेली १९ वर्षे मराठी भाषा संवर्धनार्थ
अनेक उपक्रम राबवले जातात. साहित्य, कला, संस्कृतीप्रमाणेच विद्याना-तंत्रज्ञान, व्यापार आणि उद्योग
याच्यात मराठी भाषा रुजली पाहिजे,आर्थिक व्यवहाराची मारतही भाषा व्हायला पाहिजे असे सांगून नव्या
पिढीमध्ये मराठी भाषेची वाक्यरचना व शुद्धलेखन याबद्दल काहीसी अनास्था आहे याबद्दल त्यांनी खंत
व्यक्त केली. मात्र, मराठी भाषा कधी संपणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन करुणा पाटील यांनी तर आभार नीना वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमास साहित्य, कला,
संस्कृती, नाट्य, चित्रपट, प्रकाशन अशा विविध क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते.