लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीचा निर्णय
कराड – महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवीन संदेश प्रसार धोरणामुळे लघु वृत्तपत्रांचे अस्तित्व संपुष्टात येऊन अनेक मालक, संपादक आणि त्यांचे कर्मचारी बेरोजगार होतील म्हणून लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीने आंदोलनाची भूमिका अंगीकारली आहे. या संदर्भात लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीच्यावतीने शुक्रवार ८ मार्च २०१९ रोजी महसूल व बांधकाम मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठिय्या (धरणे) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीचे समन्वयक आप्पासाहेब पाटील यांनी दिली.
लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महोदय, महासंचालक माहिती व जनसंपर्क आदि सर्व संबंधितांना पाठविलेले आहे.कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र मालक, प्रकाशक संपादकांनी शुक्रवार दि. ०८ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या (धरणे) आंदोलनासाठी कोल्हापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र बचाओ संघर्ष कृती समितीच्यावतीने आप्पासाहेब पाटील यांनी केलेले आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या या धरणे आंदोलनानंतर पुढील आंदोलनाची दिशा लघु वृत्तपत्र संपादक मालकांच्यावतीने मुंबई येथे उपोषणाचा मार्ग अवलंबिण्यात येणार आहे. असेही आप्पासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.