पुणे-मानवसेवा ही सर्वात मोठी ईश्वरसेवा मानली जाते. गृहस्थ जीवनात अनेक दुःख येतात. सुखाचा आनंद घेण्यासाठी दु:ख सहन करणे गरजेचे असते. चांगले-वाईट दिवस येतच राहतात त्यासाठी आपण कायम तयार रहावे. मात्र आपल्यासाठी जगत असतानाही आपण दुसर्यांची सेवा करणे सोडता कामा नये. जगात सगळेच नशीबवान नसतात. जे अभावात जगतात त्यांची सेवा करणे हे नशीबवानांचे सर्वात पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्वत:चा स्वार्थ सोडून इतरांची सेवा करा. त्यांचे दुख कमी करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश मुनीश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी दिला.
सकल जैन वर्षायोग समितीतर्फे आयोजित ज्ञानगंगा महोत्सवाच्या समारोप सत्रात मुनीश्री पुलकसागर महाराज बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अरविंद जैन, चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, विरकुमार शहा, उत्कर्ष गांधी, सुदीन खोत, संजय नाईक आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनिंदर बिट्टा, जिनवाणी वाहिनीचे नीरज जैन, जिनशरणचे अध्यक्ष डॉ. सुरेश जैन, पिंपरी-चिंचवडे महापौर राहुल जाधव यांनी उपस्थित राहून मुनीश्रींना श्रीफळ अर्पण करून यांचे आशिर्वाद घेतले. व प्रवचनाचा लाभ घेतला. मुनीश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांनी मुनिश्रींना पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये येण्याचे निमंत्रण या प्रसंगी दिले.
सकल जैन वर्षायोग समितीतर्फे मुनीश्री पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यात रसिकलाल एम. धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे चालू असून दि. 12 ऑगस्टपासून त्यांच्या प्रवचनांचा ज्ञानगंगा महोत्सव येथे सुरू होता. त्याची आज सांगता झाली. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. केसरी रंगाची साडी नेसलेल्या महिला आणि पांढरे कपडे परिधान केलेले पुरूष यांनी सारा मांडव फुलून गेला होता.
धार्मिक विधी, संगीत, नृत्य, प्रकाशन सोहळा, मुनीश्रींचे प्रवचन अशा भरगच्च कार्यक्रमांद्वारे अतिशय दिमाखात ज्ञानगंगा महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस चकोर गांधी आणि परिवार यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. सोनल सुधीर शहा आणि परिवार यांनी मुनीश्रींचे पादप्रक्षालन करून त्यांना शास्त्रभेट दिली. मायरा शहा आणि कायरा पाटील, नियोना या तीन लहान मुलींनी तसेच बारामती येथील पारस सहेली ग्रुप आणि श्राविका मंडळ यांच्यातर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर क्रांतीकारी राष्ट्रसंत तरूणसागर महाराज लिखीत कडवे प्रवचनीच्या दहाव्या अध्यायाचे प्रकाशन मुनीश्रींच्या हस्ते झाले. तसेच रितु संघवी, विशाल सिंघवी यांनी मुनीश्रींवर तयार केलेल्या पुलकसागरम् अॅपचे अनावरणदेखील करण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल यांनी मान्यवरांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनीश्री पुढे म्हणाले, देशाचे सैनिक आणि देशातील शेतकरी हे सर्वात मोठे आधार आहेत. आपण शांतपणे, आनंदाने जगू शकतो ते केवळ याच लोकांमुळे. मात्र आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सीमेवर रक्षण करत असणार्या जवानासाठी आपण किती विचार करतो? त्याच्या कुटुंबाच्या उदर्निर्वाहासाठी आपण मदत करतो का? जो शेतकरी दिवसरात्र कष्ट करून शेतामध्ये पीक उगवतो त्याच्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, यातून आपल्या समाजाचा खरच विकास होणार आहे का? जैन धर्म तुम्हाला इतरांचे दुःख निवारण्याची शिकवण देतो. त्यामुळेच समाजातील गरजू लोकांचे दुख, कष्ट कमी करण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे” असे ते म्हणाले. यावेळी मुनीश्रींनी रक्तदान आणि नेत्रदान करण्याचा संदेश देखील दिला.
याप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनिंदर बिट्टा म्हणाले, मी माझ्या कामानिमित्त नेहमीच फिरत असतो. भारतभर, भारताच्या बाहेरही भ्रमंती करत असतो. मात्र जगात जर कोणत्या ठिकाणी मी नतमस्तक होत असेल तर ते जैन मुनींच्या चरणांपाशी होतो. जैन मुनींचा त्याग, त्यांची तपश्चर्या याबद्दल जितके बोलावे तितके कमी आहे. इतकी कठोर तपश्चर्या जगात क्वचितच पाहायला मिळते. अतिशय विनम्र अशा जैनमुनींना भेटून जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वाटते. आज याठिकाणी मुनिश्रींजवळ मला मानवतेची सेवा करण्यासाठी अजून शक्ती द्यावी एवढाच आशीर्वाद मागतो” असे ते म्हणाले.
याप्रसंगी जैन धर्मातील एक महत्वपूर्ण स्तोत्र मानल्या जाणार्या ‘श्री उवस्सहग्गरं स्तोत्रा’चे सामुहिक पठण करण्यात आले. यावेळी या मंत्राचे विवेचन शुभम महाराज साद्विजी यांनी केले. मंचावर प्रथम वीस वेळा आठ कलाकारांनी हा मंत्र सादर केल्या नंतर या मंत्राचे 7 वेळा सामुहीक पठण करण्यात आले. याचे आयोजन समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल आणि आर.एम. फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांनी केले. मागील वर्षी यश लॉन्स येथे या उपक्रमाची धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल यांच्या उपस्थितीत सुरूवात झाल्याचे सांगून दरवर्षी हा उपक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानगंगा महोत्सवांतर्गत मुनिश्रींचे शेवटचे प्रवचन आज संपन्न झाले. यानंतर निगडी येथे होणार्या पर्युषण पर्वासाठी ते रवाना होतील. या दरम्यान पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंग येथे मुनिश्रींचा तीन दिवस मुक्काम असणार आहे. पाच सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता एचएनडी जैन बोर्डिंग येथे मुनिश्रींचे प्रवचन होईल.
या मंडपात आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे रक्तदानाची सोय करण्यात आली होती. त्यामध्ये आज अखेर 500 बाटल्या जमा झाल्यात. त्या सर्व रक्तदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समितीचे उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले