स्टॉल कि बाल्कनी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

Date:

 

कुठलं तिकीट देऊ, स्टॉल की बाल्कनी  – तिकीट खिडकीवरील क्लार्कने विचारले. ‘स्टॉलचं द्या, शक्यतो पुढचं असेल तर बघा जरा.’…तिकीट घेऊन मी निघाले. स्टॉल की बाल्कनी हा नेहमीचाच तिकीट बुक करताना विचारला जाणारा सरळ साधा प्रश्न…

नाटक बघावं स्टॉलमधून आणि सिनेमा बघावा बाल्कनीमधून ही सर्वसामान्य मानसिकता. स्टॉलचं तिकीटही बऱ्यापैकी महाग अन बाल्कनीचं त्या मानाने स्वस्त. नाटकाची जाहिरात आली की पेपरमध्ये स्टॉलची तिकीटं पटापट बुक होतात मग उशिरा गेल्यानं नाईलाजाने बाल्कनीचे तिकीट घ्यावे लागते.

अशाच एका नाटकाच्या वेळेचा अनुभव. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ कधीही बुकिंगला गेलं की स्टॉल फुल्ल. तिकीट खिडकीवर विचारलं तर म्हणाले, ‘काय करणार मॅडम, नाटक चांगलं असलं की लगेच बुक होतं बघा.’  समोर चार्ट ठेवला की तिकीट काढणारे हि किती चोखंदळपणे बघतात. अगदी कोपऱ्यातली नको…मग साईडचं नीट दिसत नाही….या मधल्या रोची साईड द्या म्हणजे कसं मध्यन्तराला लगेच बाहेर जायला मिळतं – ही बऱ्याचशा महिला वर्गाची मागणी. लहान मुलांना घेऊन येणारेही साईडच्या तिकीटाची मागणी करतात, कारण मूल रडायला लागलं की पटकन उचलून बाहेर घेऊन जायला बरं. पुढे कुणी उंच व्यक्ती आली की साईडचं तिकीट असलं की बरं म्हणजे थोडं तिरकं होऊन वाकूनही बघता यावं. पहिल्या रांगेतून काही वेळा जरा मान उंच करूनच बघावं लागतं. असे एकेक नमुने तिकीट बुक करण्याचे.

बाल्कनीमध्ये सुद्धा तीच तऱ्हा. पहिल्या दोन रांगेचं तिकीट नको कारण बाल्कनीचा कठडा मध्ये येतो ना, मग नाटक किंवा सिनेमा काय नीट दिसत नाही.

नाटक स्टॉलमधून बघण्यात मजा असली तरी ऑर्केस्ट्रा मात्र बाल्कनीमधून बघण्यात खरी मजा. स्टॉलमधला प्रेक्षक तसा सोफीस्टीकेटेड आणि बाल्कनीमधला शिट्या मारणारा आणि ‘वन्स मोअर’च्या नावाने जोरजोरात ओरडणारा…एकंदरीत धमाल करून फुल्ल टू पैसा वसूल करणारं पब्लिक. काही उत्साही प्रेक्षक मध्यंतरात बाल्कनीत उभे राहून स्टॉलमध्ये कोणी ओळखीचं आहे का ते बघत असतात, अशावेळी कोणी ओळखीचं दिसलं की त्याला कॉल करून सांगतात – अरे, वर बघ…मी हात हलवतोय. तू पण आलास या नाटकाला, आम्हाला नाही सांगितलं… इति बाल्कनी ते स्टॉल असाही संवाद! ही सगळी मजा खऱ्या अर्थाने अनुभवली ती जेव्हा फक्त दूरदर्शनवर शनिवार आणि रविवार हे दोन दिवसच सिनेमा लागायचे. त्यावेळी चित्रपटगृह आणि नाट्यगृहाचा चालता काळ होता. शनिवार आणि रविवारची सिनेमाची तिकिटे आयत्या वेळी जाऊन मिळणे शक्यच नसायचे. मग त्यावेळी तिकीटे ब्लॅकने घ्यावी लागायची. सिनेमा थिएटरच्या बाहेर बस स्टॉपच्या जवळ किंवा पानबिडीच्या दुकानाजवळ ब्लॅकने तिकीट विकणारे उभे असायचे आणि दबक्या आवाजात विचारायचे -स्टॉल की बाल्कनी? मग त्याप्रमाणे त्या तिकीटाचा दुप्पट भाव सांगायचे. हळूच पॅन्टच्या खिशातून तिकीट काढून द्यायचे कारण पोलीस पकडतील ही भीती.

सिनेमाला बाल्कनीच्या ब्लॅकचा रेट जास्तच असायचा कारण सिनेमा हा बाल्कनीतून बघण्यात खरी मजा. या ब्लॅकवाल्यांनी सर्वांत जास्त धंदा केला तो शोलेच्या वेळी. १५ ऑगस्ट १९७५ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. तिकिटांचा ब्लॅकचा धंदा करणारे तर मालामाल झालेत. बाल्कनीची अजून एक मजा अशी ही, दादरच्या कोहिनूर थिएटरची  (आता त्या ठिकाणी नक्षत्र मॉल आहे) खूप जुने थिएटर ते. त्याच्या बाल्कनीत मांजर तर हमखास असायची आणि साईडची तिकीटं मिळाली तर झुरळांचा त्रास. मग सीटवर मांडी घालून बसावे लागे आणि एकसारखं आजूबाजूला लक्षही ठेवावे लागे. असो…बाल्कनीच्या कॉर्नरच्या सीट या खास प्रेमी युगलांसाठी असायच्या.

बहुदा थिएटरमध्ये स्टॉल आणि बाल्कनी असे दोनच प्रकार होते; तर नवीन बांधलेल्या थिएटरना सांगायचंच झालं तर सत्यम, सचिनम आणि सुंदरम या थिएटरपैकी एका थिएटरला स्टॉल, बाल्कनी आणि ड्रेस सर्कलही होते. त्या ड्रेस सर्कलचं तिकीट मिळणं आणि तिथे बसून सिनेमा बघणं जाम भारी वाटायचं. त्या वेळी स्टॉल आणि बाल्कनी अशा दोन वेगळ्या तिकीट खिडक्या असायच्या. काही सिनेमा प्रेमींना दोन्ही खिडक्यांवर नंबर  लावायची सवय होती…बाल्कनीची नाहीच मिळाली तर स्टॉलची तरी मिळेल; पण रिकाम्या हाती घरी परत जायचे नाही. हल्ली सिनेमा बघण्यासाठी बरेच ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत, ऑनलाईन तिकीटही मिळतं. नाटक, सांगीतिक कार्यक्रम आणि ऑर्केस्ट्रा आजही नाट्यगृहातच जाऊन बघण्यात खरी मजा आहे. तिकीट खिडकीवर विचारला जाणारा प्रश्न त्यावेळी ही हाच होता आणि आताही तोच आहे – कुठली देऊ स्टॉल की बाल्कनी…

 

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....