पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमानंतर पुणे शहराचं नामकरण जिजाऊनगर करावे, अशी मागणी केली आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार” असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
अमोल मिटकरी यांच्या मागणीवर पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. “पुणे शहराचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगरी, जिजाऊनगर करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. खरंतर प्रात: स्मरणीय जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना वंदनीय आहेत. परंतु, जिजाऊमाता यांचं नाव पुण्याला नाव देणं उचित होणार नाही. लाल महालात राजमाता जिजाऊंचं सर्वात मोठं स्मारक उभारावं, अशी आमची जुनी मागणी आहे. ती का पूर्ण होत नाही, असा सवाल आनंद दवे यांनी विचारला आहे.