पुणे-मेट्रोच्या कामासाठी सुरु असलेल्या खोदकामांदरम्यान पुणे शहरातील स्वारगेट भागात दोन भुयारी मार्ग आढळून आले आहेत. स्वारगेट ते अॅग्रीकल्चर कॉलेज या मार्गावरील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सध्या पुण्यात सुरु आहे. दरम्यान, स्वारगेटला मल्टीमोड हब उभारण्यात येत असल्याने त्यासाठी पायलिंग मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना जमिनीखाली सुमारे १५ फुटांवर हा भुयारी मार्ग आढळून आला आहे. पूर्व-पश्चिम दिशेकडे जाणारे असे हे भुयार असून उत्तर दिशेलाही एक भुयार जाते.ही भुयारं दगडी बांधकाम केलेल्या पक्क्या स्थितीत आहे. ५० ते ६० मीटर इतकी या भुयारांची लांबी आहे. यामुळे मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी शहरात सावित्रीबाई पुणे विद्यापीठात अशाच प्रकारचा सुस्थितीतील ब्रिटिशकालिन भुयारी मार्ग सापडला होता. त्यानंतर आता स्वारगेटलाही भुयारी मार्ग सापडल्यानेयाबाबत काही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते आहे.
जमिनीखाली पाहणी केल्यानंतर आढळून आलेल्या भुयाराला तीन दिशांना वळविण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे.. या भुयाराची कालव्यापासूनची लांबी 35 ते 40 मीटर आहे. तर ज्याठिकाणी हे भुयार आढळून तेथील लांबी 55 मीटर आहे. या भुयाराची एक बाजू सारसबागेच्या (पर्वती) दिशेने वळविण्यात आलेली आहे. तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्याबाजूला वळविण्यात आलेली आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ‘टोटल स्टेशन’ मशीनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले असून भुयाराचा अंदाजे नकाशाही तयार केला आहे. हे भुयार एवढे मोठे आहे की सहा फुट उंचीची व्यक्तीही आरामात त्यामधून चालत जाऊ शकेल. भुयाराच्या तळाशी पाण्याने वाहून आणलेला सुकलेला गाळ आढळून आला आहे.
२००४ मध्ये पेशव्यांनी कात्रजच्या तलावामधून पुण्यात पाणी आणलेल्या जलवाहिनीची आम्ही पाहणी केली होती. स्वारगेटला आढळून आलेले हे भुयार त्याचाच तर एक भाग आहे कारण स्वारगेटला आढळून आलेल्या भुयाराचे बांधकाम दगडी आणि जुन्या धाटणीचे दिसून येते आहे.