नवीदिल्ली- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हाती घेतलेल्या आगळ्या वेगळ्या आणि अशा स्वरूपाच्या पहिल्याच उपक्रमा अंतर्गत भारतामधील पहिले खगोल निरीक्षण केंद्र (Night Sky Sanctuary) लडाखमध्ये उभारले जाणार असून हा प्रकल्प पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.
प्रस्तावित डार्क स्काय रिझर्व, लडाखमधील हानले येथे उभारले जाणार असून ते चांगथांग वन्य जीव अभयारण्याचा भाग असेल. त्यामुळे भारतामधील खगोल पर्यटनाला चालना मिळेल, तसेच ते ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे टेलिस्कोपसाठीचे जगातील सर्वात उंचीवरच्या स्थळांपैकी एक असेल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), प्रधानमंत्री कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे लडाखचे नायब राज्यपाल आर.के. माथूर यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली.
प्रस्तावित डार्क स्पेस रिझर्व सुरु करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद (एलएएचडीसी) लेह आणि भारतीय खगोल भौतिक शास्त्र संस्था (आयआयए) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.
ते म्हणाले, स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उपक्रम आयोजित केले जातील.