महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना (म. न. चि. क. से.), महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड. रमेश परदेशी ह्यांनी, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-कलाकार प्रवीण तरडे ह्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला .
रमेश परदेशी ह्यांनी आपला लहापणापासूनचा जिवाभावाचा मित्र प्रवीण तरडे ह्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखे ‘सरप्राइज गिफ्ट’ दिले . प्रवीण एक उत्तम लेखक असल्यामुळे त्याच्या वाढदिवसाला परदेशी ह्यांनी एक ‘वाचन यज्ञ’ सुरु केला ! सध्या ‘व्हर्चुअल गेम्स’ च्या सामन्यात मुलांमधील अवांतर वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रवीणला घडवलं ते केवळ पुस्तकांनी ! म्हणून शाळकरी मुलांनी, जिथे आयुष्याची पाया-भरणी होते – त्याच वयात खूप वाचलं पाहिजे ह्या हेतूनं ॲड. रमेश परदेशी ह्यांनी पुण्यातल्या मोरे विद्यालयात आणि पुणे महानगरपालिकेच्या पाच शाळांमध्ये, लेखक प्रवीण तरडे ह्यांच्या हातून मुलांना, ५०० प्रेरणादायी गोष्टींची पुस्तके वाटली. तेव्हा त्या मुलांना झालेल्या आंनदात प्रवीणचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला ! प्रवीण तरडे ह्यांनी तिथे मुलांना केलेल्या उत्स्फूर्त भाषणात आपल्या लहानपणाचा अनुभव कथन केला . प्रवीणला सुद्धा शाळेत असतांना असंच एक गोष्टीचं पुस्तक भेट मिळालं होतं आणि त्याच पुस्तकानं प्रवीणला आयुष्याची दिशा दाखवली . त्याला तेव्हा वाचनाची गोडी निर्माण झाली आणि मग तो वाचतच गेला . पुढे त्यानं अफाट वाचन केलं आणि त्यातूनच तो लेखन-दिग्दर्शक आणि कलाकार बनला !
रमेश परदेशी ह्यांच्या मते, ह्या अनोख्या उपक्रमामुळे मुलांमध्ये नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल आणि त्यांच्यातून अवांतर वाचनामुळे असेच प्रवीण घडत जातील . रमेश परदेशी ह्यांचा हा उपक्रम तडीस नेण्यासाठी, शब्बीर शेख आणि साहित्य दरबारचे विनायक धारणे ह्यांची मोलाची मदत झाली आहे. शिवाय ह्या ‘वाचनयज्ञा’ साठी, ‘वाचन-संस्कृती’ फोफावणारी, ‘एक सूचक, बाकी वाचक’ ह्या अभिनव संस्थेचं देखील सहकार्य लाभलं आहे. ह्या कार्यक्रमाला प्रा. के. एच. पाटील सर, ॲड. किशोर शिंदे, चंदूशेठ कदम आणि इतर मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.