आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मुक्तांगण आणि भावे प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक
पुणे – भारतीय विद्या भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरातर्फे आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत विद्यार्थी गटात मुक्तांगण प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला तर शिक्षकांसाठीच्या गटामध्ये म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेने पहिला क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतील मुलांच्या गटामध्ये दुसरा क्रमांक म.ए.सो.चे बालशिक्षण मंदिर तर तृतीय क्रमांक पवार पब्लिक स्कूलने मिळविला. तसेच शिक्षकांच्या गटातील दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पी.इ.एस. मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल व एन.सी.एल. प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळांनी पटकावला.
भजन, प्रार्थना व स्वागतगीत हा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेत शहरातील एकूण १५ शाळांनी भाग घेतला होता. विविध संघांनी मराठी
तसेच हिंदी भाषांमधील गीते रंगीबेरंगी पोशाखसह सादर केली.
या स्पर्धेसाठी पं. मुकुंद मराठे व श्रीमती शुभांगी मुळे यांनी परीक्षक या नात्याने काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ भवनचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुलोचना नातू विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका
मुख्याध्यापिका श्रीमती आरती सचदेव, श्रीमती रत्ना साहा, संगीत शिक्षक श्री. योगेश कुलकर्णी, श्री. केदार तळणीकर यांनी विशेष प्रयत्न केले.
दोन्ही गटांतील स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली गोखले व श्रीमती गायत्री गुमास्ते यांनी केले. गेल्या १० वर्षांपासून या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.