‘ रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर ‘ चे १९ जानेवारी रोजी हडपसर येथे उद्घाटन
पुणे :मज्जा संस्थेशी निगडित अर्धांगवायू आणि इतर आजारांवर उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘ रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर ‘ ची स्थापना हडपसर येथील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.
या सेंटरचे उद्घाटन शनीवारी १९ जानेवारी रोजी ,सकाळी सव्वानऊ वाजता सहयाद्री हॉस्पिटल ,हडपसर येथे होणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘ने यासाठी पुढाकार घेतला असून ४० लाख खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘ च्या अध्यक्ष अमृता देवगावकर ,माजी अध्यक्ष गणेश जाधव ,गिरीश मठकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
बायोडेक्स बॅलन्स सिस्टिम, बायोडेक्स सीट टू स्टँड ट्रेनर, पाब्लो सिस्टिम, इन्फ्रारेड लेझर थेरपी, मॅट्रीक्स रिदम थेरपी, लिव्हा को- ऑर्डिनेशन डायनॉमिक थेरपी मशीन अशी उपचार सामग्री पुण्यात प्रथमच उपलब्ध होत आहे .रुग्णांना सवलतीच्या दरात या सुविधा उपलब्ध होतील .
रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डॉ .शैलेश पालेकर यांच्याहस्ते सेंटर चे उद्घाटन होणार आहे .माजी प्रांतपाल अभय गाडगीळ ,सह्याद्री हॉस्पिटल ग्रुप चे अध्यक्ष डॉ चारुदत्त आपटे उपस्थित राहणार आहेत .रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१,३८०० ,रोटरी क्लब आकुर्डी ,रोटरी क्लब पाषाण ,रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांनी या प्रकल्पात ग्लोबल ग्रांट पार्टनर म्हणून सहकार्य केले आहे .