पाडगावकर यांनी मराठी कवितेला समृद्ध केले ‘ : डॉ. कल्याणी हर्डीकर
रसिक मित्र मंडळ ‘ आयोजित
डॉ .कल्याणी हर्डीकर यांच्या व्याख्यानाला प्रतिसाद
पुणे :’ कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी मराठी भाषेला , कवितेला समृध्द केले ‘ अशा भावना डॉ. कल्याणी हर्डीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी व्यक्त केल्या.
‘रसिक मित्र मंडळ ‘तर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांवर डॉ . कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .
‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे व्याख्यान २३ नोव्हेंबर २०१८,शुक्रवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे झाले.
या व्याख्यानात डॉ.हर्डीकर यांनी पाडगावकर यांच्या काव्यकर्तुत्वाचा , भावविश्वाचा आढावा घेतला.
त्या म्हणाल्या, ‘ कवी होणं पाडगावकर यांचं लहानपणापासून स्वप्न होतं. त्यासाठी कष्ट घेण्याची, निसर्ग आणि जगाच्या पाठशाळेत शिकण्याची तयारी होती. पाडगावकर निसर्ग वेडे जिप्सी होते, फुला – मुलांचे कवी होते , प्रेमवीर होते , प्रेमाचे कवी आणि निर्गुणाचे उपासकही होते.
हजारो कवितातून त्यांनी काव्यरसिकांना वेड लावले.भेदातीत समाज हे त्यांचे ध्येय होते आणि माणसाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास होता. सद्भावनेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या माणूसपणाचा त्यांना ध्यास होता. ‘ असेही त्या म्हणाल्या.
‘ भेट तुझी – माझी स्मरते ‘, ‘ अशी पाखरे येती ‘, ‘ कधी बहर, कधी शिशिर ‘, ‘ इतुके आले जवळ ‘, ‘ जिप्सी ‘, ‘ प्रेम, प्रेम.. प्रेम म्हणजे प्रेम असते ‘ अशा अनेक कवितांचा आढावा डॉ.हर्डीकर यांनी या व्याख्यानादरम्यान घेतला.
पाडगावकर यांच्या ३o काव्यसंग्रहातील निवडक कविता एकत्र करणे मराठी साहित्यात राहून गेले, तसेच एकत्रित समीक्षा राहून गेली, अशी खंतही डॉ.हर्डीकर यांनी या व्याख्यानात व्यक्त केली.
‘रसिक मित्र मंडळ ‘चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले.
मंगेश पाडगावकर यांच्या जीवनावरील काही दुर्मिळ ध्वनी -चित्रफिती तसेच अरुण दाते यांनी गायलेली पाडगावकर यांची भावगीते या वेळी दाखविण्यात आली .
‘एक कवी -एक भाषा ‘ या व्याख्यानमाले अंतर्गत हे 59 वे व्याख्यान होते.
सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते डॉ.हर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला