सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा: पालकमंत्र्यांना घेराव
पुणे :
लवळे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हल विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांना सनबर्न विरोधी कृती समितीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव घालून सनबर्न फेस्टिव्हल रद्द करण्याची मागणी केली.
गणेशोत्सव , दहीहंडी उत्साहावेळी जे निकष प्रशासनाकडून लावले जातात ते सनबर्न फेस्टिव्हलला आहे का ? , रात्री १० वाजता ध्वनिक्षेपण यंत्रणा बंद करणार का ? किती डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा या सनबर्नला घालण्यात आली आहे यासह या फेस्टिव्हलमध्ये अनधिकृत होणारी मद्यविक्री , सुरक्षिततेचा प्रश्न आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन आदी विविध मुद्दे उपस्थित करून सनबर्न विरोधी कृती समितीने शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी नसताना या सनबर्नची जाहिरात कशी काय ? असा सवाल उपस्थित करून सनबर्न फेस्टीव्हल रद्द करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणादरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आम्ही कीर्तन करणारी माणसे आहोत, आमचाही या सनबर्नला विरोध आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून न्यायप्रविष्ट बाब असून न्यायालयच निर्णय घेईल अशी भूमिका मांडली . या लाक्षणिक उपोषणात प्रशांत कनोजिया, समीर गांधी, केशव तेलंगी ,नितीन ननावरे ,राहुल म्हस्के,अनुप मारणे ,संतोष शिंदे ,दिलीप विश्वकर्मा,जांबुवंत मनोहर,सचिन पवार ,रुपेश घोलप ,रवि बनसोडे,शेखर काळे,अजय कदम ,बाळा अहीवळे,दत्ता माळी,अमोल शिंदे,केतन डोंगरे, शैलेंद्र दीक्षित आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सनबर्न फेस्टीव्हल रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले.