पेशव्यांच्या वारसांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार होणार
पुणे-नाना पेठ क्वार्टरगेट येथील ‘ऑरनेलाज स्कूल’ हायस्कूलजवळ असणाऱ्या सिटी चर्चला 8
डिसेंबर 2017 रोजी तब्बल 225 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शोभयात्रा, धर्मगुरुंचे आशीर्वाद व
प्रवचन, कोनशिला अनावरण, सत्कार व धार्मिक विधी व प्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. तसेच हे सिटी चर्च व परिसराची सुमारे 4 एकर जमीन माधवराव पेशवे यांनी
दिली. नाना फडणवीस यांनी पेशव्यांचे कारभारी या नात्याने पेशव्यांच्या वतीने आर्थिक मदत चर्च
बांधण्यासाठी दिली. या भव्य चर्चची पायाभरणी व शेडची उभारणी 8 डिसेंबर 1792 रोजी झाली व
टप्प्याटप्प्याने हे चर्च पूर्ण करण्यात आले. श्रीमंत पेशव्यांनी दाखविलेल्या या औदार्याबद्दल कृतज्ञता
म्हणून पेशव्यांच्या वंशजांचा सहकुटुंब गौरव या प्रसंगी करण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, शाल,
श्रीफळ व सन्मान चिन्ह असे या गौरवाचे स्वरूप असेल. हा सत्कार स्वीकारण्यासाठी श्री.विनायकराव
पेशवे, त्यांचे पुतणे श्री.महेंद्र पेशवे हे पेशव्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
सिटी चर्चच्या प्रांगणात सायं. 6 वाजता संपन्न होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात गोव्याचे
आर्चबिशप फिलिप नेरी फेरावो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी पुणे
धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे, बिशप व्हेलेरियन डिसूझा, फादर अँड्र्यू फर्नांडिस (S. J.), फादर
माल्कम सिल्व्हेरा, विकर जनरल ऑफ पुणे आणि सिटी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर सॅल्व्हेडॉर पिंटो,
तसेच पेशव्यांचे वारस मंचावर उपस्थित असतील. या भव्य मंचावर आकर्षक बॅकड्रॉप उभारण्यात आला
आहे.
या कार्यक्रमात स्वागत फादर सॅल्व्हेडॉर पिंटो करणार असून त्यानंतर स्वागत व पेशव्यांच्या
वारसांचा सत्कार केला जाईल. या प्रसंगी विविध रंगी 225 फुगे लहान मुलांच्या हस्ते आकाशात सोडले
जातील. बिशप थॉमस डाबरे व प्रमुख पाहुणे गोवा प्रांताचे आर्चबिशप फिलिप नेरी फेरावो यांचे आशीर्वाद
व प्रवचन होईल व मंचावरच धार्मिक विधी संपन्न होतील व सर्वांना प्रसाद दिला जाईल.
यानंतर चर्चमध्ये आतापर्यंतच्या सर्व बिशपांचा नामनिर्देश असणाऱ्या संगमरवरी कोनशिलेच उद्घाटन केले जाईल व त्यानंतर भव्य शोभायात्रेस सुरूवात होईल.
ही शोभायात्रा सिटी चर्च येथून निघून क्वार्टरगेट चौक दस्तूर मेहर मार्ग, कॅम्प मार्गे पुन्हा सिटी
चर्चकडे येईल. या शोभायात्रेत अग्रभागी मुंबईचा प्रख्यात सेंट फ्रान्सीस बँड असणार असून सिटी चर्चचे
प्रमुख फादर सॅल्व्हेडॉर पिंटो व अन्य धर्मगुरु व नन्ससह सुमारे 2000 ख्रिश्चन बांधव व भगिनी हातात
प्लॅकार्ड, झेंडे व बॅनर घेऊन प्रार्थना व गीत म्हणत शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. या मार्गावर
ठिकठिकाणी ख्रिश्चन बांधवांबरोबरच अन्यधर्मीय बांधव व विविध सार्वजनिक मंडळे चौकाचौकात
डेकोरेशन करून शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत करतील. या शोभायात्रेत अग्रभागी मदर
मेरीचा पुतळा घेऊन विशिष्ट वेशभूषा परिधान केलेले युवक असतील. ही शोभायात्रा सिटी चर्चमध्ये
परतल्यानंतर चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर पिंटो या आनंद सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेला झेंडा
खाली उतरवतील आणि मेरीचा पुतळा चर्चमध्ये नेण्यात येईल आणि या भव्य सोहळ्याची सांगता
होईल.