पुणे–तीन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पुणे महापालिकेचे 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी मंजूर करण्यात आले. सर्व पक्षीय नगरसेवकांनी या अंदाजपत्रकावर आपले विचार मांडले.
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, सुनील कांबळे आमदार झाल्यावर मला पक्षाने स्थायी समिती अध्यक्ष पदाची संधी दिली. त्या दोन ते अडीच महिन्यांत माझी भूमिका ‘नाईट वॉचमनची’ होती. सुरुवातीपासून माझी भूमिका महसूल वाढीची होती. गेली अनेक वर्षे दीड ते 2 हजार कोटी बजेटमध्ये तूट येते. त्याचा मी अभ्यास केला. महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. 25 ते 30 वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेल्या उमेदवारांशी चर्चा केली.50 ते 60 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात चार ते साडेचार हजार कोटी अंदाजपत्रक अतिशय कमी आहे. आज मला आत्मविश्वास आहे, हा सर्व अर्थसंकल्प महसूल जमा होण्यावर आहे. प्रस्तावित प्रकल्प का पूर्ण होत नाही, याचा अभ्यास करत आहोत. चला आपण सर्व एकत्र येऊ, आणि या पुणे शहराचा विकास करू, असे आवाहनही त्यांनी केले.