पुणे -महापालिकेतर्फे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचे आयोजन करताना अनेक चुकीच्या व्यक्तींचे सल्ले ऐकल्याने महापौर मुक्ता टिळक या स्वतः अनेकदा अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. आज त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अक्षरशः त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
५००० ढोल वादनाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्या नंतर शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव मध्ये आता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये 1000 दुचाकी सहभागी होणार असून या माध्यमातून पर्यावरण विषयक संदेश देणार आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठया प्रमाणात दुचाकी रस्त्यावर उतरल्याने होणार्या प्रदुषणाला जबाबदार कोण या प्रश्नाला उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला.
यंदाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे १२५/१२६ वे वर्ष असून यानिमित्त महिना भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून २०तारखेला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, आरोग्य, पर्यावरण आदीबाबतीत संदेश देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेने नुकताच जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालातून दुचाकीचे प्रमाण वाढल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. असे असताना दुचाकी रॅलीकडून प्रदुषणात भर टाकून कशा प्रकारे प्रदुषणाबाबत संदेश दिला जाणार आहे, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला.