पुणे – महापालिकेतील 52 वरिष्ठ अभियंत्यांची काल रात्री तडका फडकी बदली करण्यात आल्यानंतर आयुक्त कुणालकुमार यांच्याविषयी पालिकेच्या अधिकारी वर्गात आज असंतोष उसळला . महापालिकेच्या वतिने 24 तास पाणी पुरवठा योजना राबविन्यासाठी 2,264 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव नुकताच महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर झाला. यातील पाईप लाइनच्या कामाची निविदा आल्याने त्यासोबत करण्यात येणाऱ्या केबल डक्टच्या कामाचे एस्टीमेट करणे नियमबाह्य ठरेल असे स्पष्ट करत एस्टीमेट कमिटिने त्याला विरोध केला होता.यामुळेच आयुक्त संतापले आणि या बदल्या केल्या असा आरोप अधिकारी करू लागले आहेत.
या बदल्या करताना पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा पदभार काढून घेत या योजनेसाठी आयुक्तांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सेल स्थापन केला आहे. परंतु या बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमधे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व विभाग प्रमुखानी आज स्थायी समिति बैठकीवर अघोषित बहिष्कार घातला.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार सोमवारी रात्री यांनी हे बदलीचे आदेश काढले. परंतु प्रथमच दुसऱ्या दिवशी ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याने पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. बदली झालेल्यांमधे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, श्रीकांत वायदंडे , पथ विभागाचे युवराज देशमुख यांचा समावेश आहे.
बदल्यांचे आदेश आज सकाळी हाती पडल्यानंतर अधिकाऱ्यांमधे तिव्र असंतोष पसरला. अशातच दुपारी 2 वाजेपर्यंत नविन नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावे लागणार असल्याने रिलीव लेटरसाठी अधिकारी विभागप्रमुखांच्या कर्यालयात जमले होते. त्यामुळे विभाग प्रमुखही स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीकडे फिरकले नाहीत.