नवी दिल्ली, 12 जून 2019-अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकत असून, उद्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, दि.13 जून रोजी सकाळी ताशी 145 ते 170 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या वेळी दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश
पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाने वायु चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जलद प्रतिसादासाठी पुढील तयारी सुरु केली आहे.
- राज्य प्रशासन, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करणाऱ्या सूचना देण्याचे तसेच खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश द्यायला सांगितले आहे.
- नौदलाच्या जहाजांवर मानवी सहायता आणि आपत्ती मदत सामुग्री तैनात आहे.
- समुद्रात कार्यरत असलेली भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने/हेलिकॉप्टर्सना समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- स्थानिक प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाची बचाव पथके आणि मदत सामुग्री तयार ठेवणे.
- आपतकालीन वैद्यकीय मदतीसाठी मुंबई स्थित अश्विनी या भारतीय नौदलाच्या रुग्णालयातल्या वैद्यकीय पथक आणि सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
- पी8आय आणि आयएल विमाने शोध आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
- मुख्यालय, किनाऱ्यावरील संरक्षण आणि सल्लागार गटाने वायू चक्रीवादळबाबत किनारपट्टी प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत.
भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश