पुणे-टाळ मृदंगच्या गजरात आणि वरूण राजाच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. यावेळी महापौर आणि पदाधिकारी यांच्याकडून मुख्य दिंडीतील शेकडो वारकऱ्याना मृदंग भेट देण्यात आला. त्यांनी स्व:खर्चातून ही भेट दिली आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी उद्योग नगरी दुमदुमून निघाली होती. यावेळी महापौर राहुल जाधव हे संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत पाहायला मिळाले. त्यांनी मुख्य रथाचे सारथ्य देखील केले.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. मंगळवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. त्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू असताना देखील वारकरी स्थिरावले नाहीत. त्यांची पाऊलं पंढरीच्या दिशेने अखंडपणे पडत होती.
पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचं पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.