नाशिक -येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांचे जीव टांगणीला आहे. या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला.ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली आहे.या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत.अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.