पुणे-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून आणि 15 जानेवारी 2023 रोजी बंगळूरू येथे साजऱ्या होणार्या लष्कर दीना निमित्त, भारतीय लष्कराने 24 डिसेंबर 22 रोजी प्रथमच, अकरा राज्यांमधील तेहतीस शहरांमध्ये रक्तदान मोहिमेचे आयोजन केले आहे. या दिवशी भारतीय लष्कराचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय मानवी प्राण वाचवण्यासाठी ऐच्छिक रक्तदान करणार आहेत. यावेळी संकलित झालेले रक्त आणि रक्त घटक गरजू रुग्णांपर्यंत वेळेवर पोहोचावे, यासाठी भारतीय लष्कर, ही मानवतावादी मोहीम प्रमुख सरकारी रुग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयाने राबवत आहे.
‘रक्तदान करा – प्राण वाचवा’ या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली ही रक्तदान शिबिरे 15 जानेवारी 23 रोजी होणाऱ्या 75 व्या लष्कर दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण कमांड तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इतर विविध कार्यक्रमांचा एक भाग आहेत. भारतीय सैन्याची, ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून 7,500 युनिट रक्ताची व्यवस्था करण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी, त्या दिवशी 75,000 स्वयंसेवकांची डेटा बँक तयार करण्याची योजना आहे. या शिबिरामध्ये लष्कराचे जवान, त्यांचे कुटुंबीय, एनसीसी कॅडेट, नागरी संरक्षण कर्मचारी, आर्मी पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि समाजाच्या सर्व स्तरांमधील निरोगी स्वयंसेवक रक्तदान करतील. ही शिबिरे दक्षिण कमांडच्या अखत्यारीतील सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पणजी, जोधपूर, जैसलमेर, भुज, नाशिक, अहमदनगर, भोपाळ, झाशी, नासिराबाद, सिकंदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या आणि अन्य शहरांचा समावेश आहे.
पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटल पुणे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), लष्करी रुग्णालय खडकी आणि लष्करी रुग्णालय खडकवासला या चार प्रमुख ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केली जाणार असून या अंतर्गत, केवळ एका दिवसात सुमारे 500 युनिट रक्त संकलित केले जाणार आहे.
राष्ट्र उभारणीसाठीच्या मोठ्या जबाबदाऱ्यांचा एक भाग म्हणून, भारतीय लष्कर आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. या रक्तदान मोहिमेमुळे समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिक, विशेषतः युवा वर्गाला त्यांचे समाजाप्रति असलेले कर्तव्य बजावण्याची आणि अमूल्य प्राण वाचवणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल