पुणे-
सिस्टेमा.बायो (Sistema.bio) या मेक्सिको स्थित शेतकऱ्यांना सामाजिक उपक्रमाद्वारे उच्च दर्जाचे बायोगॅस निर्मिती तंत्रज्ञान प्रदान करणाऱ्या पहिल्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन चाकण-पुणे येथे झाले. येथून बायोडायजेस्टर चे उत्पादन भारतात सुरु करण्यात आले असून याचे उद्घाटन कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी श्री. कॅमिलो पेजेस यांच्या हस्ते पार पडेल. याच वेळी कंपनीने उत्पादन केंद्रात २०० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा केली. भारतात बायोगॅस अणुभट्ट्या तयार करणे आणि त्या कमीत कमी किंमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा सिस्टेमा.बायो चा मुख्य हेतू आहे.
या वेळी श्री. कॅमिलो पेजेस म्हणाले की ” भारतात बायोगॅस संयंत्रांची प्रचंड क्षमता लक्षात घेता आम्ही 2018 मध्ये सिस्टेमा.बायो इंडिया ची भारतात सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत, आम्ही देशभरातील अनेक दुग्ध – शेती व्यवसायिकांकडून मोठा विश्वास संपादित केला आहे. यामुळे आम्ही आमच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाजवळ उत्पादन केंद्र उभारण्यास प्रवृत्त झालो. या कारखान्यात एका वर्षात ३०,००० बायोडायजेस्टर तयार करण्याची क्षमता असेल आणि आम्हाला आशिया आणि भविष्यात आफ्रिकेतील शेतकऱ्यांना पुरवठा करण्यास मदत होईल.”
बायोडायजेस्टर उत्पादन करणारा हा प्रकल्प चाकणच्या २५० एकर औद्योगिक क्षेत्रात २०,००० चौरस फूट परिसरात उभा करण्यात आला आहे. डिसेंबर २०२१ पासून सिस्टेमा.बायो इंडिया ने दरमहा २००० बायोडायजेस्टर उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे. कारखान्याच्या माध्यमातून कंपनी २५० हून अधिक लोकांना रोजगार निर्माण करत असून, कंपनी सामाजिक उपक्रमात भारतात एक मजबूत पुरवठा साखळी तयार करण्याची योजना आखत आहे. यापूर्वी बायोडायजेस्टर ची आयात मेक्सिकोमधील त्यांच्या मूळ कंपनी मधून होत होती. मात्र आता भारतात चालू होणाऱ्या या उत्पादनामुळे बायोडायजेस्टरची किंमत २०% नी कमी करण्याची योजना असून याचा फायदा शेतकरी कुटुंबाना आर्थिकदृष्ट्या होईल.
या वेळी व्यवस्थापकीय संचालक श्री. पियुष सोहानी म्हणाले की “आम्ही गुजरातमध्ये एका छोट्या गावात २५ बायोडायजेस्टर बसवून २०१८ मध्ये भारतात आमचा प्रवास सुरू केला आणि दोन वर्षांत आम्ही 14 राज्यांमध्ये विस्तार केला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात डेअरी शेतकऱ्यांना सेवा देण्याच्या दृष्टीने, आम्ही आता आमच्या बायोडायजेस्टरच्या निर्मितीकडे वाटचाल करत आहोत जेणेकरून आमची उत्पादने शेतकऱ्यांना अधिक परवडतील आणि वर्षभर उपलब्ध असतील. तसेच आम्ही भारतात बनवलेले बायोडायजेस्टर आफ्रिकन आणि आशियाई देशांना निर्यात करणार आहोत.”
सध्या, भारतातील १४ राज्यांमध्ये पसरलेले ८५,८७२ पेक्षा जास्त लोक सिस्टेमा.बायो च्या डायजेस्टर्सच्या सहाय्याने स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्माण करत आहेत. 2020 मध्ये, सिस्टेमा.बायो इंडियाने बायोडायजेस्टर वितरीत करण्यासाठी आणि बायोगॅसबद्दल जनजागृती करण्यासाठी कंबोडिया, नेपाळ आणि फिलिपिन्समधील संस्थांसोबत भागीदारी देखील केलेली आहे