नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अहमदाबाद-धोलेरा दरम्यान विकसित केल्या जात असलेल्या द्रुतगती महामार्गाची पाहणी केली. हा 109 किमी लांबीचा महामार्ग, 4200 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.
हा मार्ग, अहमदाबाद आणि धोलेरा यांच्यादरम्यानचा एक महत्वाचा मार्ग असून, तो धोलेरा आणि अहमदाबाद मधल्या अनेक विशेष गुंतवणूक क्षेत्रांना जोडतो. ह्या द्रुतगती मार्गामुळे, अहमदाबाद आणि धोलेरा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून, त्यामुळे, प्रवासासाठी लागणारा वेळ, सुमारे एक तासाने ( सध्या हा वेळ,सुमारे सव्वा दोन तास इतका लागतो) कमी होणार आहे. तसेच, यामुळे, धोलेरा इथल्या विमानतळावर देखील थेट पोहोचता येणार आहे.
हा मार्ग नवागाम इथं धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे सरखेजला जोडला जातो. तसेच सरदार पटेल रिंग रोडला धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राशी (SIR)जोडतो. हा द्रुतगती मार्ग अहमदाबाद आणि धोलेरा येथील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठीही उपयुक्त ठरेल.