नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आलेला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी त्यांना आलेली आहे. आम्हाला खंडणी द्या नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नाही, असं त्यांना फोनवरुन सांगण्यात आलं. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.
या प्रकारानंतर गडकरींच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूरमध्येच आहेत. त्यातच हे धमकीचे फोन आल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता त्यांच्या कार्यालय व निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. नितीन गडकरी यांच्या नागरूप येथील खामला परिसरातील कार्यालयात शनिवारी धमकीचे 3 फोन आले. सकाळी 11.30 च्या सुमारास पहिला फोन आला. त्यानंतर काही वेळाने दुसरा व तिसरा फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदचे नाव घेत गडकरींकडे खंडणीची मागणी करण्यात आली. पैशांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर गडकरींना जीवे मारण्यात येईल, असे धमकी देणारा म्हणाला.
या दूरध्वनीनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली. तद्नंतर पोलिसांनीही तातडीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन तपास सुरू केला. सायबर पोलिसांचे एक पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. एटीएसही पोहोचल्याची माहिती आहे. हे सर्वजण फोन करणाऱ्याचा माग काढण्याच्या प्रयत्नांत आहेत. उच्चपदस्थ पोलिस अधिकारीही गडकरींच्या कार्यालयात पोहोचले आहेत.
पोलिसांनी या घटनेचा वेगवान तपास करत धमकी देणाऱ्याचा फोन ट्रेस केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फोन कर्नाटकच्या एका भागातून करण्यात आला होता. आता पोलिस फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत आहेत.