पुणे- एकूण ११ हजार कोटीच्या प्रकल्पांच्या प्रस्ताव बद्दल संशय असल्याचा आरोप करणाऱ्या शहर राष्ट्रवादीने आज महापालिकेतील ६ हजार कोटींच्या कामांच्या प्रस्तावाबद्दल चौकशी ची मागणी करणारे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे .आम्ही पहिल्या टप्प्यात हि मागणी केली आहे , अन्य प्रकल्पांची पुढील टप्प्यात तक्रार करू असे यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची भेट घेतली. सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.अशी तक्रार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. नदी सुधार प्रकल्पाचा काल उल्लेख केला असला तरी आज तक्रार देताना या प्रकल्पाला वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६ विषयांच्या निविदा ज्यांचे मुल्य सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्या संबंधित प्रकरणाची पुणेकरांच्या व महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ताबडतोब चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी माजी आमदार .जयदेवराव गायकवाड, माजी महापौरअंकुश काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, समन्वयक महेश हांडे उपस्थित होते.
या तक्रारीत प्रामुख्याने म्हटले आहे तरी काय ते पहा –
विषय क्र.१) २४/७ समान पाणीपुरवठा योजनेत खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हितासाठी अनेक बदल
पुणे महानगरपालिकेच्या २४/७ समान पाणीपुरवठा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व यामध्ये खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत आणि अनियमितपणे वाढवण्यात आली आहे.
विषय क्र.२) विशिष्ट संस्थेच्या फायद्याचाच विचार करून बाणेर, वारजे येथे १००० कोटीचे रुग्णालयाचा प्रस्ताव
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर व वारजे येथे महानगरपालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पद्धतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल उभे करण्याची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न चालू आहे. यामध्ये देखील मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे.याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.३) 350 अँमिनिटी स्पेसेस
पुणे शहरातील पुणेकरांच्या हक्काच्या 350 अँमिनिटी स्पेसेस या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे याची देखील आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.४) ‘जायका’ काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या मार्फत गैरव्यवहार -अनियमितता
‘जायका’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून आले आहे काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या विशेष विचार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.५) खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी शाळेचे आरक्षण असलेल्या जागेचा प्रस्ताव मान्य
१६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती या बैठकीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी यांच्या हितासाठी नियमबाह्य पद्धतीने आरक्षित असलेल्या प्राथमिक शाळा उभारणीचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात आला या प्रस्तावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपूर आर्थिक हितसंबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते यामुळे या प्रकरणाची आपले विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.६) समाविष्ट गावांत ड्रेनेज लाईन साठी ३९३ कोटीच्या टेंडर मध्ये गफला
समाविष्ट गावांचा ड्रेनेज लाईन टाकणे या ३९३ कोटीचे निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयाने देखील दाद मागितली आहे व तक्रार दाखल केलेली आहे या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येते याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.