पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्याचे आणि ‘सक्षम ‘ या उमेदवार प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन आज सायंकाळी गौरविण्यात आले. हा कार्यक्रम आज १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह (पुणे -सातारा रस्ता ) येथे झाला. .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार एड . वंदना चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या , ‘ महानगरपालिकेच्या निवडणुकीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या . पक्षासाठी झटून काम करा. पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत. यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमध्ये काम करणार्या तरुणांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय मनापासून समाजासाठी काम करीत असतो, परंतु त्या सर्वांनाच महापालिकेची पूर्ण ओळख असतेच असे नाही. म्हणून त्यांच्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते .यामध्ये शहरीकरणाची आव्हाने, शाश्वत शहरे आणि पर्यावरण, महानगरपालिकेने केलेली विकासकामे, महापालिकेचे कामकाज, राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमे, मानवी विकास निर्देशांक, राजकीय व सामाजिक सद्यस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येय धोरणे या विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना आज प्रमाणपत्रे देण्यात आली.
निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी पक्षाने मुलाखतींचा २ दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे . १७ ,१८ डिसेंबर रोजी मुलाखती सकाळी साडे आठपासून होतील. तसेच पक्षाच्या वतीने सर्वांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष खासदार एड . वंदना चव्हाण, एड .म . वि. अकोलकर , एड. भगवानराव साळुंखे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल , अशोक राठी , शंकर शिंदे , सर्व सेलचे पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शंकर शिंदे यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण शहराध्यक्ष खासदार एड . वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांना पेढे वाटण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात ‘हिंदोळा शब्द स्वरांचा’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.