पुणे : पाण्याचे मीटर बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी वापरताना काळजी घेतली जाईल . असे प्रतिपादन सकाळ वृत्तसमूहाचे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी येथे केले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये . ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत पहिल्या सत्रात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, वंदन नगरकर आणि सकाळ वृत्तसमूहाचे सहयोगी संपादक सुनील माळी यांनी मार्गदर्शन केले.
सुनील माळी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते यांना तुमच्या शहराचा मूलभूत अभ्यास, प्रश्नांची माहिती, सद्यस्थितीचे ज्ञान असणे आवश्यक असते. आणि हे सगळे माहीत असावे, हे माहीत करून घेण्याची वृत्ती असावी लागते.
आपल्या पुणे शहरात नागरीकरणाच्या सहा समस्या आहेत असे सांगून ते म्हणाले, प्रदूषण-जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण, वाहतूक समस्या, शहराचे केंद्रीकरण, झोपडपट्टी, साधन संपत्तीचा अपव्यय आणि कचरा या समस्या सोडविण्यासाठी काय केले पाहिजे, हे ठरविणे गरजेचे आहे. जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रकल्पाना चालना देणे गरजेचे आहे. वायुप्रदूषण कमी होण्यासाठी वाहनांची संख्या कमी झाली पाहिजे पर्यायाने सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बसेस साठी डेपो, पीएमपीएमएलसाठी पायाभूत सुविधा हव्यात, सक्षमीकरण हवे, अंतर्गत वर्तुळाकार रास्ता (रिंग रोड) बीआरटीचे जाळे असावे. शहराचे केंद्रीकरण होण्यासाठी पीएमआरडीए प्लॅन वेगाने अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. झोपड्यांचे पुनर्वसन, पक्की घरे होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत एसआर ए नियम बदलले पाहिजेत, त्यासाठी आग्रह धरला पाहिजे. आपल्या शहरी मानसिकतेमुळे नैसर्गिक साधन संपत्तीची उधळ माधळ थांबविली पाहिजे . पाण्याचे मीटर बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी वापरताना काळजी घेतली जाईल .
कचरा प्रश्न गंभीर आहे. ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करणे त्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे ओला कचरा नागरिक राहतात तिथेच जिरवला गेला पाहिजे. यासाठी प्रयत्नांची गरज आहे,’ असे सुनील माळी यांनी सांगितले.
नागरिकांना विश्वासात घेवून कामे करा
विवेक वेलणकर यांनी पुण्यातील पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण मंडळ आणि महावितरण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना येणार्या समस्या याविषयी विश्लेषण केले.
‘वॉर्ड सभा घेऊन नागरिकांना काय हवे आहे? हे कधीच विचारले जात नाही. वॉर्ड सभा घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेणे, त्यांच्या सूचना लक्षात घेणे, नागरिकांशी चर्चा करून त्याप्रमाणे काम केले पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे’,
हे शिबीर आशीष गार्डन, कोथरूड येथे झाले यावेळी खासदार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे , माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम, निरीक्षक हरीश सणस, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, कोथरूड अध्यक्ष मिलिंद बालवाडकर, रजनी पाचंगे, रुपाली चाकणकर, अमित अगरवाल उपस्थित होते .
जनतेच्या सुख, दुःखाशी कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे : अजित पवार
संध्याकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत आपण जनमानसात आहोत हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे जनतेच्या सुख दुःखाशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपण आहोत हा विश्वास जनतेमध्ये वाढवला पाहिजे. नागरिक चोखंदळ आणि विचारी झाले आहेत. हे विसरून चालणार नाही.
आज कोणतीही घटना घडली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते नागरिक त्याची दखल घेतात तेव्हा कोणतेही चांगले काम करताना स्वतःपासून सुरुवात करा. राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली तर पुणे शहर हे भारतातील सर्वोत्तम शहर अशी ओळख आपण निर्माण करू शकू. यासाठी कामाला लागा असा सल्ला अजित पवार यांनी दिला.